आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांपूर्वी न्यायालयात दाद मागत ‘ताे’ बनला स्वाती; आता आसामची पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - ट्रान्सजेंडरला न्यायाधीशपद देणारे आसाम ईशान्येतील पहिले आणि देशातील तिसरे राज्य ठरले आहे. स्वाती बिधान बरुआ यांनी गुवाहाटीच्या कामरूप जिल्ह्यात शनिवारी लोकअदालतीचे कामकाज सांभाळले. न्यायालयातील २० न्यायाधीशांच्या पीठात स्वाती यांचा समावेश आहे.


बी.काॅमनंतर कायद्याचा अभ्यास केलेल्या स्वाती या आता पैशाच्या देवाण-घेवाणी संदर्भातील प्रकरणे हाताळतील. ट्रान्सजेंडर व्यक्तीला न्यायाधीश म्हणून नियुक्त करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी पश्चिम बंगालने जुलै २०१७ मध्ये पहिल्यांदा जॉयता मंडल यांच्या रूपाने पहिल्या ट्रान्सजेंडरची न्यायाधीशपदी नियुक्ती केली होती, तर फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील नाग कामबल यांंची नागपूरच्या लोकअदालतीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्वाती यांनी २०१२ मध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कुटुंबाने याला विरोध दर्शवला. तेव्हा त्या मुंबईत नोकरी करत होत्या. लिंगबदलासाठी त्यांनी काही रक्कम जमवली. पण कुटुंबाने त्यांना गुवाहाटीला परत बोलावले. शस्त्रक्रिया करू नये म्हणून कुटुंबातील लोकांनी त्यांचे अकाऊंट ब्लॉक केले. त्यानंतर स्वाती यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने त्यांना शस्त्रक्रियेस मंजुरी दिली व त्यांनी स्वाती म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. आता कुटुंबानेही त्यांना स्वीकारले आहे. स्वाती म्हणतात की, माझ्या नियुक्तीनंतर ट्रान्सजेंडरही समाजाचा एक भाग आहेत  यावर लोकांचा विश्वास बसणाार आहे.

 

ट्रान्सजेंडरलाही कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात

एका अहवालानुसार, आसाममध्ये ५ हजारहून अधिक ट्रान्सजेंडर्स आहेत. स्वाती यांनी २०१७ मध्ये गुवाहाटी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यात धोरण ठरवण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली. बरुआ या ऑल आसाम ट्रान्सजेंडर्स संघटनेच्या नेत्या आहेत. त्या म्हणाल्या, सार्वजनिक ठिकाणी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पदोपदी अपमान होतो. पोलिसही मारहाण करतात. हा अन्याय थांबायला हवा. ज्या दिवशी भेदभाव संपेल आणि त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील त्या दिवशी माझी मोहीम पूर्ण झाल्याचे समजेन.

 

बातम्या आणखी आहेत...