आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेडीयू-भाजपत मतभेद नाहीत, जागावाटपाची काहीही घाई नाही; नितीश यांची स्पष्टोक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपाचा तिढा सोडवण्याची आम्हाला कुठलीही घाई नाही, अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी दिली. 


साप्ताहिक 'लोकसंवाद' कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नितीशकुमार म्हणाले की, आमची भाजपशी असलेली युती बिहारपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळेच इतर राज्यांत जेडीयू भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करत आहे. मात्र, भाजपविरोधी आघाडीत आम्ही सहभागी होणार नाही. मी येथे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याशेजारी बसलेलो आहे. त्यातून सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरू असून दोन्ही पक्षांत काहीही समस्या नाहीत हेच स्पष्ट होते. 


बिहारमध्ये आपल्याला 'मोठ्या भावाची' भूमिका हवी आहे, यासाठी जेडीयू आग्रही आहे का, तसेच राज्यात रालोआतील भाजप, लोकजनशक्ती पक्ष आणि आरएलएसपी हे इतर घटक पक्ष जेडीयूसाठी आपापल्या जागा सोडण्यास तयार नाहीत का,या प्रश्नावर नितीशकुमार म्हणाले की, माध्यमांमध्ये काय चर्चा सुरू आहे त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर योग्य वेळी तोडगा काढला जाईल आणि त्याची माहितीही जाहीर केली जाईल. आम्हाला त्याबाबत सध्या तरी काही घाई नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा १२ जुलैला पाटणा येथे येत आहेत. त्यावेळी त्यांच्याशी माझी भेट होणार आहे, असे नितीशकुमार यांनी सांगितले, पण या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. शहा आणि नितीशकुमार यांच्यात जागावाटपावर चर्चा होणार असे म्हटले जात आहे. काँग्रेसशी युती होण्याची काही शक्यता आहे का, या प्रश्नावर थेट उत्तर देणे नितीशकुमार यांनी टाळले. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी काही काँग्रेसचा अध्यक्ष नाही, असे उत्तर त्यांनी दिले. 


बिहारमध्ये नितीशकुमारच रालोआचा चेहरा : पात्रा 
२०१९ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार हेच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) चेहरा असतील, तर राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ निवडणुकीच्या मैदानात उतरेल, कारण देश त्यांच्याच नेतृत्वात विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छितो, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

बातम्या आणखी आहेत...