आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना पळ‌वणारी टोळी आल्याचा संशय; जमावाच्या मारहाणीत अभियंत्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/हैदराबाद- मुले पळवणारी टोळी आली असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी कर्नाटकमधील बिदरजवळ घडली. मात्र पोलिसांनी या घटनेची माहिती रविवारी दिली. मोहंमद आझम उस्मानसाब (२८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून तो हैदराबादचा रहिवासी आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता आहे. 


या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उस्मानसाब आणि त्याचे तीन मित्र बिदर जिल्ह्यातील हांडीकेरा गावातील मोहंमद बशीर अफरोज या त्यांच्या एका मित्राकडे आले होते. ते हैदराबादला परत जात असताना एका खेड्याजवळ थांबले. तेथे काही मुले दिसल्यामुळे त्यांनी या मुलांना चॉकलेट्स दिली. मात्र, चॉकलेटचे आमिष दाखवून मुलांना पळवणारी ही टोळी आहे, असा संशय आल्याने ग्रामस्थांनी या चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी या प्रकाराची छायाचित्रे व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. त्यामुळे तेथे मोठा जमाव जमा झाला. या चौघांनी घटनास्थळाहून कशीबशी सुटका करून घेतली. मात्र, मुरकी गावाजवळ जमावाने त्यांना पकडले आणि दगड तसेच लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण केली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 


मारहाणीत दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले. पोलिसांनी कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या चौघांना रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयाच्या वाटेवरच उस्मानसाबचे निधन झाले. इतर तिघांना हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात ३० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरवण्यात आली आणि जमावाला एकत्रित करण्यात आले, त्या ग्रुपच्या अॅडमिनचाही समावेश आहे. ज्या व्यक्तीने हल्ल्याची छायाचित्रे काढली आणि ती व्हायरल केली त्याचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


महाराष्ट्र, तामिळनाडूतही घडले होते प्रकार

मुले पळवणारी टोळी आली, अशी अफवा पसरवून मारहाण करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही अशीच अफवा सोशल मीडियावरून पसरल्यामुळे पाच जण ठार झाले होते. तामिळनाडूतील मदुराई येथेही १२ जुलै रोजी एका तरुणीला मारहाण झाली होती. पोलिसांनी तिची जमावाच्या ताब्यातून सुटका केली होती. 

बातम्या आणखी आहेत...