आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत विनापरवाना ध्वनिक्षेपक शनिवारपासून काढण्याचे आदेश;ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ  - सार्वजनिक ठिकाणांवरील ध्वनिक्षेपक काढून टाकण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला मंदिर, मशीद, सार्वजनिक ठिकाणांवरील ध्वनिक्षेपकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने १० पानी दिशानिर्देश जारी करत ७ जानेवारी रोजी सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी ध्वनिक्षेपक बसवणाऱ्यांची पाहणी करण्यास सांगितले होते. याशिवाय विनापरवाना ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले होते.  धार्मिक, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक बसवण्यासाठी १५ जानेवारीपूर्वी परवानगी घेतली नसेल तर सरकार २० जानेवारीपासून संबंधित ध्वनिक्षेपक काढणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


अन्यथा ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई  : आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ध्वनिक्षेपक काढून टाकण्याची मुदत सोमवारी संपल्याचे मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. ज्यांनी परवानगी घेतली नाही आणि ध्वनिक्षेपक काढूनही टाकले नाहीत, अशांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर अरविंद कुमार यांनी जिल्हा स्तरावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सरकारने परवानगी अर्जाचे स्वरूप जाहीर केलेले आहे.  


अवैध ध्वनिक्षेपक बसवणारे व त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली, याची माहिती लखनऊ खंडपीठाने २० डिसेंबर रोजी मागितली होती. न्यायालयाने यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस पाठवून १ फेब्रुवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. 

 

सार्वजनिक ठिकाणी १० डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज नसावा  
उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अाणि अन्य सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकांसाठी परवानगी घेण्यात आली होती काय, अशी विचारणा राज्य सरकारला केली होती. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी व शांतता क्षेत्राची वर्गवारी करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज आसपासच्या आवाजाच्या  १० डेसिबल्सपेक्षा जास्त नसावा.  

बातम्या आणखी आहेत...