आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 26 रोजी केरळमधील शाळेत तिरंगा फडकवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या २६ जानेवारी रोजी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत तिरंगा फडकवणार आहेत. ही शाळा एका संघ स्वयंसेवकाकडून चालवण्यात येते. केरळातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त  सरकारी व शैक्षणिक संस्थांसाठी एका परिपत्रकाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.  


या परिपत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक संस्थेतील प्रमुखाने तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. या वेळी त्यांनी राष्ट्रगीत म्हणणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाला मोहन भागवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून कर्नाकिम्मान उच्च माध्यमिक शाळेत ध्वजारोहण केले होते. ही शाळा शासनाच्या अनुदानावर चालते, हे विशेष. रा. स्व. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्ह्यात व्यास विद्यापीठम उच्च माध्यमिक शाळा संघाच्या स्वयंसेवकांनी चालवलेली आहे. या शाळेत सरसंघचालक भागवत  २६ जानेवारीला ध्वजारोहण करतील.  


पलक्कड येथील शाळा सरकारी नाही. त्यामुळे कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे हा सर्वस्वी शाळेचा निर्णय  आहे. शाळेच्या समिती सदस्यांनी भागवत यांना निमंत्रित केले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समन्वयक के. के. बलराम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. शासनाचे परिपत्रक खासगी शाळांना लागू होत नाही, असे त्यांनी सांगितले.  


मोहन भागवत केरळात तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून शाळेमध्ये संघ स्वयंसेवकांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. तेथे तिरंगा ध्वज फडकवणे यात काही चुकीचे नाही, असे बलराम म्हणाले.  

 

संघाच्या वाढीसाठी शिबिरात चर्चा  
आगामी काळात संघटनात्मक कार्य आणि संघकार्याच्या वाढीसाठी या शिबिरात विचारमंथन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ५ हजार पदाधिकारी या शिबिरात सहभागी होत आहेत, अशी माहिती बलराम यांनी दिली. भागवत गुरुवारी पलक्कड येथे येत असून ते  उद्याच परत निघणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...