आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिराने भाविकांना ठरवून दिला ड्रेसकोड; मोकळे केस साेडून महिलांना प्रवेश नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील श्री राजराजेश्वरी मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी भाविकांना विशेष पोशाख (ड्रेसकोड) ठरवून दिला आहे. याशिवाय मंदिर परिसरात त्यांची वर्तणूक कशी हवी यासंबंधीच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. महिलांनी जीन्स, टी-शर्ट घालून मंदिरात प्रवेश करू नये, अशा बातम्या प्रसारमाध्यमात आजवर वाचायला मिळाल्या. पण बंगळुरूतील मंदिराने एक पाऊल पुढे टाकून मोकळे केस करून येणाऱ्या महिलांना प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार केसांना रबर किंवा रिबन बांधूनच महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.   


मंदिराच्या परिसरात महिलांना स्लीव्हलेस, जीन्स आणि मिनी स्कर्ट परिधान करून प्रवेश करता येणार नाही. चुडीदार किंवा सलवार कुर्ती आणि ओढणी असेल तरच त्या मंदिरात प्रवेश करू शकतात. ड्रेसकोडबाबत बंगळुरूच्या आर. आर. नगरमधील या मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत. यात धोती किंवा पँट घातलेली असेल तर त्यांना प्रवेश दिला जाईल. जीन्स-टी शर्ट किंवा बर्म्युडा असल्यास त्यांना मंदिरात येता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनाने १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठीही ड्रेसकोड ठरवला आहे. फुल लेंथचा गाऊन घातल्यासच त्यांना प्रवेश दिला जाईल. मंदिर ट्रस्टचे सदस्य हयग्रीव म्हणाले की, संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारचे नियम गरजेचे आहेत. यात नवीन असे काही नाही. दुसरीकडे येथील नागरिक धनंजय म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाचा हा निर्णय चुकीचा आहे. सध्याच्या युगात महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले गेले आहेत. भाविकांनी साडी नेसली की जीन्स यामुळे काही फरक पडत नाही.

बातम्या आणखी आहेत...