आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराजा सयाजीराव गायकवाड संमेलननगरी (बडाेदा)- ‘अनुवाद म्हणजे शब्दाला प्रतिशब्द ठेवणे नव्हे. मूळ लेखकाच्या साहित्यकृतीचा गाभा न दुखावता, त्याची स्वभाषेत केलेली मांडणी म्हणजे अनुवाद,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, अनुवादक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव यांनी रविवारी केले. मराठी साहित्य संमेलनात ‘अनुवाद : गरज, समस्या आणि उपाय’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रकाश भातंब्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात डॉ. जाधव यांच्यासह डॉ. छाया महाजन, सुषमा लेले, गुरय्या स्वामी आणि डॉ. काशीनाथ बऱ्हाटे सहभागी झाले होते.
‘एका भाषेतील सकस लेखनविचार स्वभाषेतील वाचकापर्यंत पोचवण्याच्या गरजेपोटीच अनुवाद केले जातात,’ असे सांगून डॉ. जाधव म्हणाले,‘अनुवादाची प्रक्रिया वेळ मागते. अनुवादकाला दोन्ही भाषांवरील प्रभुत्व अनिवार्य असते. मूळ भाषेतील साहित्यकृती स्वभाषेत अनुवादित करताना, आशय अबाधित राखण्याची किमया अनुवादकाला करायची असते. अनुवाद म्हणजे भाषांतर नसते. शब्दाला केवळ प्रतिशब्द देणे म्हणजे अनुवाद नाही. तर मूळ विषय नेमकेपणाने समजून घेत, अभ्यासपूर्वक केलेली मांडणी म्हणजे अनुवाद असतो.’
प्रकाशकांकडून महत्त्व नाही
‘अनुवादाला प्रकाशक फारसे महत्त्व देत नाहीत, मानधनही अल्प असते, वाचक कमी संख्येने असतात आणि अनुवादाचे विषय अनेकदा चुकतात. या समस्यांची उकल प्रकाशक, लेखक आणि वाचक या त्रिकुटाने एकत्रितपणे सोडवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे साहित्यिक अनुवादांची संख्या फार कमी दिसते, त्या तुलनेत करिअर, आरोग्य हे विषय अधिक संख्येने अनुवादित होतात,’ असे निरीक्षणही जाधव यांनी नोंदवले.
निखळ अनुवाद दुर्मिळ
सुषमा लेले आणि डॉ. महाजन यांनी अनुवाद प्रक्रियेसंदर्भातील समस्या आणि उपायांविषयी सांगितले की, ठरावीक विषयांवरील आणि ठरावीक लेखकांचीच पुस्तके अनुवादित केली जातात, असे दिसते. त्यात करिअर, वैद्यकीय, व्यायाम, यशस्वी कसे व्हावे या प्रकारच्या पुस्तकांचे आधिक्य असते. ज्याला निखळ साहित्य म्हणावे, असे अनुवाद दुर्मिळ झाले आहेत. वाचकांकडूनही निखळ साहित्यिक अनुवादांची विचारणा होत नाही. ती झाल्यास साहित्यिक ग्रंथांचे अनुवाद वाढतील आणि एक समतोल साधला जाईल. ‘अनुवाद प्रक्रिया अर्थकारणाशी खूप जास्त निगडित असल्याचे मत गुरय्या स्वामी आणि डॉ. बऱ्हाटे यांच्या विवेचनातून पुढे आले.
दर्जा अावश्यक : भातंब्रेकर
‘अनुवाद हा ग्रंथव्यवहाराच्या मुख्य प्रक्रियेत आलेलाच नाही, असे मत प्रकाश भातंब्रेकर यांनी मांडले. प्रकाशकांनी स्वत:हून अनुवादकाकडे यावे, या दर्जाचा अनुवाद करणेही गरजेचे आहे. साहित्य अकादमी उत्तम अनुवादकांना ५० हजार रुपयांचा पुरस्कार देते. स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा यावर अनुवादकांचे प्रभुत्व असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.