आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात तिसऱ्या दिवशीही हिंसाचार, 112 जणांना अटक; मुख्य आरोपी निसटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासगंज- उत्तर प्रदेशात प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा फेरीदरम्यान उफाळून आलेला हिंसाचार रविवारीही सुरूच होता. रविवारी सकाळी समाजकंटकांनी कासगंजमध्ये एका दुकानास आग लावली. या प्रकरणात आतापर्यंत ११२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सात जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, तर हिंसाचारात ठार झालेल्या चंदनचा मारेकरी व या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार शकील अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे गावठी बॉम्ब व पिस्तुलाचा साठा सापडला.  


उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून नेत्यांच्या दौऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कासगंज येथे दोन गटात दंगल झाल्याचे पोलिस महासंचालकांनी मान्य केले. आरोपी आणि समाजकंटकांना मोकळे सोडले जाणार नाही. गरज पडल्यास त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी संशयितांची मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. घराघरांत जाऊन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री उशिरा कासगंजजवळील नदराई व चुंगी येथे ३ वाहने पेटवून देण्यात आली. २६ जानेवारी रोजी देशभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. कासगंज येथील तिरंगा यात्रेत  काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्यावरून दंगल उसळली असे सांगण्यात येते. 

 

ड्रोनद्वारे परिसरावर देखरेख
कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) रोजी दोन गटात झालेल्या हिंसक घटनेनंतर विविध भागात त्याचे पडसाद उमटले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले अाहे. जिल्ह्यावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.

 

कलम १४४ लागू, इंटरनेट बंद  
रविवारी सकाळी लहानमोठ्या घटना घडल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रशासनाने पोलिसांसह पीएसी, शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. अफवा पसरू नयेत म्हणून जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.  

 

> राज्य सरकार दंगलीस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करणार आहे. गुंड व कट रचणाऱ्यांना मोकळे सोडणार नाही.
- दिनेश शर्मा, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश


> उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य चालण्याऐवजी जंगलराज सुरू झाले आहे. कासगंज जिल्ह्यातील घटना याचे ताजे उदाहरण आहे.
- मायावती, अध्यक्षा, बसपा


> कासगंज येथे भाजप सरकार दंगल घडवून आणत आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नको पण दंगलग्रस्त भागात शांतता हवी आहे.
-सुनिलसिंह साजन, प्रवक्ता, सपा

बातम्या आणखी आहेत...