आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळा: चौथ्या खटल्यातही लालू दोषी; दोषींना 21, 22 आणि 23 मार्च रोजी होणार सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारा घोटाळ्यात लालू यादव यांच्याविरोधात सहा प्रकरणे सुरु आहे त्यातील चौथ्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले. - Divya Marathi
चारा घोटाळ्यात लालू यादव यांच्याविरोधात सहा प्रकरणे सुरु आहे त्यातील चौथ्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले.

रांची-  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने चारा घोटाळ्यातील चाैथ्या खटल्यातही सोमवारी दोषी ठरवले. दुमका कोशागारातून ३.७६ कोटी रुपयांची अवैध उचल केल्याप्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने लालूसह १९ अारोपींना दोषी ठरवले. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता केली. लालू यादव यांना आतापर्यंत सहापैकी ४ खटल्यांत दोषी ठरवले गेले आहे. दोषींना शिक्षा ठोठावण्याच्या मुद्द्यावर २१, २२ आणि २३ मार्च रोजी सुनावणी केली येईल. 

 

तीन प्रकरणांत यापूर्वीच झाली शिक्षा  
- चाइबासा कोशागारातून ३७.७० कोटींची उचल केली. २० सप्टेंबर २०१३ रोजी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. पाच वर्षांची शिक्षा.  
- देवघर कोशागारातून ८९.२७ कोटींची अवैध उचल. २३ डिसेंबर २०१७ रोजी दोषी ठरवले. साडेतीन वर्षांची कैद.  
- चाइबासा कोशागारातून ३३.६२ कोटींची अवैध उचल. २४ जानेवारी २०१८ रोजी दोषी सिद्ध. ५ वर्षे शिक्षा.  

 

निर्णयावर आरजेडी काय म्हणाली? 
- आरजेडी नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले, 'एक आदमी को बेल और एक आदमी को जेल हे नरेंद्र मोदी का खेल.' हा सर्व नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचा खेळ आहे. पुन्हा एकदा लालू यादवांना जेलमध्ये जावे लागले आणि जगन्नाथ मिश्रा यांची सुटका झाली आहे.

 

कोर्टात आले नव्हते लालू यादव 
- सीबीआयच्या विशेष कोर्टाने सोमवारी निर्णय सुनावला. यावेळी लालू यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक राजद नेते आले होते. मात्र निर्णय सुनावला गेला तेव्हा ते कोर्टात हजर नव्हते. 
- रविवारी लालू यादव यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

 

काय आहे दुमकी ट्रेझरी प्रकरण?
- दुमकी ट्रेझरीमधून डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 पर्यंत बेकायदेशीररित्या 3.76 कोटी रुपये काढण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने 11 एप्रिल 1996 मध्ये 48 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 11 मे 2000 रोजी पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली होती.

 

केव्हा उघड झाला घोटाळा?
- जानेवारी 1996 मध्ये जवळपास 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा समोर आला होता. 
- 1990च्या दशकात चारा पुरवठ्याच्या नावाखाली सरकारी ट्रेझरीमधून अशा कंपन्यांना पैसे देण्यात आले ज्या अस्तित्वातच नव्हत्या.

 

लालूंवर कोणता आरोप?
- चारा घोटाळा झाला तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते. झारखंड आणि बिहार तेव्हा विभक्त झालेले नव्हते. 
- मुख्यमंत्री असताना लालू यांच्याकडे अर्थखातेही होते. 
- त्यांच्यावर आरोप आहे की त्यांची पदाचा गैरवापर करत चौकशीसाठी आलेली फाइल 5 जुलै 1994 ते 1 फेब्रुवारी 1996 पर्यंत अडकवून ठेवली होती. 2 फेब्रुवारी 1996 ला चौकशीचे आदेश देण्यात आले.

 

लालूंना या दोन प्रकरणात शिक्षा झाली...
1) देवघर ट्रेझरी केस :
लालू यादव (69) यांच्यासह 16 आरोपींना 6 जानेवारी 2017 रोजी साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आील होती. त्यासोबत 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 
2) चाईबासा ट्रेझरी केस : 24 जानेवारी 2018 रोजी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


1997 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात गेले होते लालू
- 1997 मध्ये लालू यादव यांना सर्वप्रथम न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा ते 137 दिवस तुरुंगात होते आणि राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 12 डिसेंबर 1997 रोजी लालू यादव तुरुंगातून बाहेर आले होते. 
- तुरुंगात जाण्याची दुसरी वेळ 28 ऑक्टोबर 1998 मध्ये लालूंवर आली होती. पाटण्याच्या बेऊर तुरुंगात ते गेले होते. यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला होता. यावेळी फक्त एक दिवस तुरुंगात राहिले होते. 
- चाऱ्याच्या नावावर चाईबासा ट्रेझरीमधून 37 कोटी रुपये काढण्यात लालू यादव दोषी ठरल्यानंतर 2013 मध्ये त्यांना तुरुंगवास झाला होता. तेव्हा दोन महिने ते रांचीच्या तुरुंगात होते. 25 लाख रुपये दंडही झाला होता. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

बातम्या आणखी आहेत...