आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांच्यापुढील अडचणी (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एेन सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी व जावई यांना भ्रष्टाचारप्रकरणी तेथील नॅशनल अकाउंटिबल ब्युरोने १० वर्षांची शिक्षा सुनावणे हा योगायोग नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांची प्रतिमा जेवढी बदनाम, कलंकित करता येईल, जनमतामधील शरीफ यांच्या लोकप्रियतेमध्ये जेवढ्या प्रमाणावर फूट पाडता येईल तेवढे प्रयत्न पाकिस्तानच्या राजकारणात टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. त्यातील शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा सुनावणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. शरीफ यांनी अवैध मार्गाने संपत्ती कमावली असून लंडनमध्ये त्यांचे आलिशान फ्लॅट आहेत, ही मालमत्ता कोणत्या मार्गाने कमावली या मुद्द्यावर न्यायालय व शरीफ यांच्यात गेले दीड वर्ष संघर्ष सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये शरीफ यांचे नाव आल्यानंतर तेथील न्यायालय अधिक सक्रिय झाले आणि शरीफ यांच्याभोवती फास आवळले गेले. न्यायालयाने निर्णय जाहीर करताना सार्वत्रिक निवडणुकांचा शेवटचा माहोल निवडला आहे हे विशेष. 


पाकिस्तानात येत्या २४ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून नवाझ शरीफ लंडनमध्ये त्यांच्या पत्नीसोबत आहेत. शरीफ यांच्या पत्नीला कर्करोग झाल्याने त्या लंडनमध्ये उपचार घेत अाहेत. त्यासाठी शरीफ कुटुंबीय तिकडेच आहेत. गेल्या वर्षी शरीफ यांना न्यायालयाने निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. पण शरीफ यांनी या काळात देशभर दौरे करून आपल्याविरोधात लष्कर व न्यायालयाचा कट असल्याचा प्रचार केला होता. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने शरीफ यांची लोकप्रियता न कमी होता वाढत गेली. यामुळे लष्करापुढे िचंता वाढत होती. शरीफ यांनी आपण १३ जुलैपर्यंत पाकिस्तानात परत येऊ, असे वचन जनतेला दिले आहे. त्यानुसार ते आल्यास त्यांना अटक होऊ शकते व त्यांची तुरुंगात रवानगी केली जाऊ शकते. मात्र, तसे झाल्यास शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाला या अटकेचा निवडणुकीत मोठा राजकीय फायदा होऊ शकतो, असा आरोप प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. कारण या निवडणुकीत खुद्द पाकिस्तानी लष्कराचा इम्रान खान यांना छुपा पाठिंबा आहे. शरीफ यांच्या तुलनेत इम्रान यांची लोकप्रियता कमी आहे, पण त्यांच्यासोबत काही घटक पक्ष जाऊन आघाडी पक्षांचे सरकार यावे, अशा व्यूहरचना लष्कराकडून आखली जात आहे. सोमवारी इम्रान खान यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. त्यात आपले सरकार सत्तेवर आल्यास 'नवा पाकिस्तान' घडवू. 'इस्लामी वेल्फेअर' हे आपल्या सरकारचे सूत्र असेल, असे त्यांनी म्हटले आहे. पण शरीफ यांच्या लंडनमधून येण्या न येण्यावर बरेच काही अवलंबून आहे. 


शरीफ यांना भ्रष्टाचाराप्रकरणी शिक्षा सुनावल्याने त्यांच्या राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. ८० च्या दशकात लष्करप्रमुख झिया उल हक यांच्या मदतीने शरीफ यांनी बेनझीर भुत्तो व आसिफ अली झरदारी यांच्याविरोधात राजकीय आघाडी उघडली होती. झरदारींना १० वर्षे तुरुंगात पाठवण्यात शरीफ यांचा मोठा वाटा होता. त्या वेळी त्यांना लष्कर व न्यायालयांनी मदत केली होती. पण मुशर्रफ यांनी शरीफ यांना पदच्युत केल्यानंतर शरीफ प्रस्थापितांच्या विरोधात गेले व तेथून त्यांचा संघर्ष सुरू झाला. मुशर्रफ लष्करप्रमुखपदी असताना शरीफ दुबई व प. आशियात विजनवासात होते. सुमारे आठ वर्षांनंतर ते पाकिस्तानात आले आणि सलग दोन वेळा ते पंतप्रधान म्हणून निवडून आले. पण या काळात त्यांनी मुशर्ऱफ राजवटीतील लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नोंद केले गेले. याने लष्कर दुखावले गेले. म्हणून आजच्या घडीला पाकिस्तानचे लष्कर शरीफ यांचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शरीफ यांची चहुबाजूंनी कोंडी झाली असली तरी पाकिस्तानच्या राजकारणात लष्करशाही पुन्हा आणणे हा काही सद्य:स्थितीवर तोडगा नाही. तो भारतासह पाकिस्तानलाही धोकादायक आहे. गेली ६०-६५ वर्षे पाकिस्तानच्या लष्कराकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय सूत्रे आहेत. पण लष्कराला पारदर्शक, लोकांचे हित पाहणारे प्रशासन आणता आलेले नाही. खुद्द लष्कर स्वत:ला भ्रष्टाचारमुक्त करू शकलेले नाही. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांत लष्कराबद्दल ममत्व आहे, पण त्याला देशात लष्करशाही यावी, असे वाटत नाही. त्याच्या दृष्टीने शरीफ यांचे पाकिस्तानच्या राजकारणात येणे येथील लोकशाही जिवंत राहिल्याचे लक्षण आहे. १३ जुलैला शरीफ आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. 

बातम्या आणखी आहेत...