आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करप्रमुख म्हणाले, शांततेसाठी लष्करी मोहिमेसोबत मुत्सद्देगिरीची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जम्मू़-काश्मीरमध्ये शांतता कायम टिकवण्यासाठी लष्करी मोहिमांबरोबरच मुत्सद्देगिरीची गरज आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. सीमेपलीकडून येणारा दहशतवाद राेखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी आक्रमक कारवाई करण्यावरही त्यांनी भर दिला. लष्करप्रमुखांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मुत्सद्देगिरीबरोबरच इतर उपाययोजनाही करण्याची गरज आहे.  आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर  काश्मीरमध्ये शांतता कायम राखली जाऊ शकते. आपणास मुत्सद्देगिरी-लष्करी दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. सरकारने ऑक्टोबर महिन्यात गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची जम्मू-काश्मीरमध्ये सर्व पक्ष-संघटनांशी चर्चा करण्यासाठी संवादक म्हणून नियुक्ती केली होती. 


जम्मू-काश्मीरमध्ये आता असलेले लष्करी दल सध्या आहे तसेच कायम राहील असे सांगता येणार नाही. त्यांना परिस्थितीशी तोंड देता यावे म्हणून नवी व्यूहरचना व युद्धनीती आखण्याची गरज आहे. एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर त्या तुलनेत आता परिस्थिती खूप सुधारली आहे. पाकिस्तानवर दबाव वाढवण्याची गरज आहे, असे लष्करप्रमुख म्हणाले. पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यास मदतच होईल. त्यांच्या अतिरेकी कारवायांवर अंकुश ठेवता येईल. 


सर्व प्रक्रियांचा लष्कर एक भाग  
लष्करप्रमुख रावत म्हणाले, लष्कर काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेतील एक भाग आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी व त्यांच्या कारवाया रोखणे,  जे तरुण कट्टरपंथाकडे चालले आहेत, त्यांना पुन्हा शांततेच्या मार्गावर आणणे ही आमची जबाबदारी आहे. काही स्थानिक तरुणांना कट्टरवादाच्या मार्गापासून दूर करून त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे दहशतवादी संघटनेत चालले आहेत, त्यांना त्यापासून परावृत्त करत आहोत. तरुणांना अतिरेकी संघटनांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी आम्ही अतिरेकी संघटनांवर कारवाई करून त्यांच्यावरही दबाव आणला जात आहे.


लष्करप्रमुख हे शिक्षणतज्ज्ञ नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये : अल्ताफ
जम्मू-
लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जम्मू-काश्मीरमधील सरकारी शाळांमधून शिकवण्यात येणाऱ्या शिक्षण पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर जम्मू-काश्मीरचे शिक्षणमंत्री अल्ताफ बुखारी यांनी  लष्करप्रमुखांवर टीका केली आहे. हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो, आम्हाला शिक्षणाचा गाडा हाकता येतो. त्यात लष्करप्रमुखांनी लक्ष घालू नये, अशी टीकाही त्यांनी केली.  


बुखारी म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये दोन ध्वज आहेत. तसेच जम्मू-काश्मीर व भारताच्या दोन राज्यघटना आहेत. प्रत्येक शाळेजवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी राज्याचा नकाशा आहे. दरम्यान, लष्करप्रमुखांनी जम्मू-काश्मीरमधील शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे म्हटले होते हे विशेष उल्लेखनीय.  


काय म्हणाले होते लष्करप्रमुख रावत  
जनरल रावत यांनी म्हटले होते, जम्मू-काश्मीरमधील शाळा, मदरसे आणि मशिदीत भारताबरोबरच जम्मू-काश्मीरचा नकाशा वेगळा दाखवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत कट्टरवाद व फुटीरतावादाला प्रोत्साहन मिळते आहे. राज्यातील शिक्षण पद्धतीची पुनर्रचना व्हायला हवी असे त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...