आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत: कर्नाटकातील अामचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल; देवेगाैडांना विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- “आय हॅव सीन दिल्ली इनफ.  पुन्हा दिल्लीत जाण्यात मला रस नाही. त्यापेक्षा माझ्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर धर्मनिरपेक्ष पक्षांची सत्ता आणण्यासाठी मी करणार आहे,” असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातले कॉंग्रेसबरोबरचे जागा वाटप हा अडचणीचा मुद्दा ठरणार नाही, असा त्यांचा दावा आहे. कर्नाटकातले आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असाही विश्वास त्यांना वाटतो.   


देवेगौडांच्या या वक्तव्यामागे विरक्तीपेक्षा राजकीय अपरिहार्यता खरे तर जास्त आहे. कारण जनता दल सेक्युलर (जेडीएस) या प्रामुख्याने दक्षिण कर्नाटकापुरत्या सीमित राहिलेल्या या पक्षाच्या मर्यादा राजकारणात पाच दशके घालवलेले देवेगौडा जाणून आहेत. सध्या त्यांच्या पक्षाचे स्वतःला धरून केवळ दोन खासदार आहेत. जेडीएसच्या खासदारांची संख्या आजवर कधीही चारच्या पुढे सरकलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणातली  ‘दुसरी इनिंग’ खेळण्याची संधी निसटत चालल्याचे देवेगौडांनी ओळखले आहे. त्याऐवजी ‘गोष्टी सांगेन चार युक्तीच्या,’ असे म्हणत राष्ट्रीय राजकारणातले ज्येष्ठत्व आणि सन्मानाचे स्थान भक्कम करण्याची भूमिका सध्या त्यांनी स्वीकारली आहे. ‘कॉंग्रेस, भाजप जेडीएसला संपवायला निघाले आहेत. हे दोघेही आमचे शत्रू आहेत,” असे महिन्यापूर्वी सांगणाऱ्या देवेगौडांचे प्राधान्य अचानकपणे कॉंग्रेसने देऊ केलेले मुख्यमंत्रिपद ५ वर्षे टिकवण्याला आहे. सोनिया-राहुल यांच्याशी सलोखा टिकवण्यावर त्यांचा भर आहे. ‘या उपरही सर्वांच्या पसंतीचा उमेदवार म्हणून ‘२०१९’ मध्ये माळ गळ्यात पडणार असेल तर काय,” या प्रश्नावर स्मितहास्य करत देवेगौडांनी उत्तर देणे टाळले.   


माेदींचा पराभव करायचाय, त्यासाठी काँग्रेसशी तडजाेडीची ‘जेडीएस’ची तयारी
देवेगौडा ८५ वर्षांचे आहेत. जेडीएसची सूत्रे ताब्यात राखून असणाऱ्या देवेगौडांची राजकीय ऊर्जा कर्नाटकची सत्ता हाती आल्यामुळे वाढली आहे. एच. डी. कुमारस्वामी हा एक मुलगा मुख्यमंत्री आणि दुसरा मुलगा एच.डी. रेवण्णा कॅबिनेट मंत्री अशी दोन महत्त्वाची पदे घरात आहेत. नरेंद्र मोदी विरोधातल्या आघाडीच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये देवेगौडांचा समावेश केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने देवेगौडा यांच्याशी त्यांच्या बंगळुरूतल्या निवासस्थानी संवाद साधला.   


अवघे ३८ आमदार असताना कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळाले. गेल्या दहा वर्षांत आक्रसत गेलेल्या जेडीएसच्या विस्तारासाठी याचा कसा फायदा होईल, यावर देवेगौडा म्हणाले, “अलीकडच्या काही वर्षात कॉंग्रेस-भाजपचे आव्हान आमच्यापुढे उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे. मात्र धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करण्याची गरज राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आता जाणवली आहे. आमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना आणखी अवकाश देण्याची तयारी ते दाखवत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. कुमारस्वामींच्या कामातून दलित, मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.’   


मंत्रिपद वाटप आणि तुम्हाला मिळालेल्या मुख्यमंत्रिपदावरून स्थानिक कॉंग्रेसमध्ये जेडीएसबद्दल तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. कुमारस्वामी आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातला संघर्ष सर्वश्रूत आहे. २०१९ मध्ये जागा वाटपावरून कॉंग्रेसशी संघर्ष होण्याची शक्यता आहे का? “नरेंद्र मोदींचा पराभव करायचा तर तडजोड प्रत्येकाला स्वीकारावी लागेल. जागा वाटपासंदर्भात अजून आमची चर्चा झालेली नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि आम्ही समोरासमोर बसू तेव्हा सगळे सुरळीत होईल,” असे म्हणत देवेगौडा यांनी जागावाटपात स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना फार महत्त्व नसल्याचे सूचित केले.   


अामचा पक्ष जातीयवादी नाही   
भाजपला जातीयवादी ठरवत असताना तुमचा पक्षही वक्कलिगांच्या समर्थनावरच उभा आहे. तुमच्या ३८ पैकी ३० खासदार वक्कलिगांचे प्राबल्य असलेल्या फक्त ‘ओल्ड म्हैसुरू’तूनच निवडून आले. तुमच्या पक्षाचा आधारही जातीयवादी असल्याचा स्पष्ट आरोप केला जातो...यावर नकारार्थी मान हलवत देवेगौडा उत्तरले, “हा भाजपचा अपप्रचार आहे. केवळ वक्कलिगा नव्हे दलित, मुस्लिमांचा आमच्यावर विश्वास आहे. इतर धर्मीयांचीही मते आम्हाला मिळाली. मुख्यमंत्री, पंतप्रधान असताना मुस्लिमांसाठी मी खूप काम केले. गैरसमजातून आताच्या निवडणुकीत आमचा मुस्लिम मतदार कॉंग्रेसकडे गेला. सत्तेच्या माध्यमातून पुन्हा तो आमच्याकडे येईल असा विश्वास आहे.”  

 
शिवसेनेबाबत निर्णय हाेईल   
गेल्या महिन्यात विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एच. डी. देवेगौडा यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावेळी जेडीएस भाजपची ‘बी टीम’ असल्याचा प्रचार कॉंग्रेसने केला. परंतु, तो केवळ राजकीय सभ्यता आणि शिष्टाचाराचा भाग असल्याचे खुलासा देवेगौडांनी तातडीने केला. तरीही याचा फटका त्यांना बसला. हक्काच्या मतदारसंघातील दलित, मुस्लिम मतदार कॉंग्रेसकडे वळल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. हा आमच्यासाठी काळजीचा विषय असल्याचे देवेगौडांनी मान्य केले. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येऊ नयेत यासाठी धर्मनिरपेक्ष मतांमधले विभाजन टाळायला हवे.” गैरभाजपा आघाडीत शिवसेनेचा समावेश होऊ शकतो का, यावर सर्वसंमतीने निर्णय होईल, असे ते म्हणाले.   


माेदी अन‌् एचडी दाेघेच अनाेखे सीएम टू पीएम     
अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारचे पतन झाल्यानंतर अचानकपणे हरदनहळ्ळी दोडेगौडा देवेगौडा हे कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झाले. ‘सीएम टू पीएम’ अशी झेप घेणारे दोनच राजकारणी देशात. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून थेट देशाचे अकरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे देवेगौडा पहिले. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच केवळ असा चमत्कार करू शकले. तत्पूर्वीच्या राजकीय इतिहासात मोरारजी देसाई (मुंबई प्रांत), चरण सिंग (उत्तर प्रदेश), व्ही. पी. सिंग (उत्तर प्रदेश) आणि पी. व्ही. नरसिंहराव (आंध्र प्रदेश) हे मुख्यमंत्री पंतप्रधान झाले. परंतु, पीएम होण्यापूर्वी त्यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या पायऱ्या ओलांडाव्या लागल्या होत्या. 

  
संभाव्य इच्छुकांमध्ये देवेगौडांचेही नाव   
पंजाबव्यतिरिक्त एकाही राज्यात स्वबळावर सत्तेत नसलेल्या कॉंग्रेसला ‘२०१९’मध्ये  अपेक्षित संख्याबळ गाठणे मुश्किल होईल, या गृहितकावर तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव चालू आहे. करुणानिधी (डीएमके), मुलायमसिंग (सपा), ममता बॅनर्जी (तृणमूल कॉंग्रेस), चंद्राबाबू (तेलुगू देसम), मायावती (बसपा), शरद पवार (राष्ट्रवादी), के. चंद्रशेखर राव (तेलंगणा राष्ट्र समिती), लालू यादव (रालोद), शरद यादव (लोकतांत्रिक जनता दल), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा), केजरीवाल (आप), डावे पक्ष हे डझनभर प्रादेशिक पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. एच. डी. देवेगौडा यांचेही नाव या यादीत आहे.


अभी तो मै जवान हूॅं !
कॉंग्रेसला बाजूला ठेवून पंतप्रधानपद मिळवण्याची अनेक प्रादेशिक नेत्यांची ईर्षा दिसते. कॉंग्रेसला पुरेशा जागा न मिळाल्यास नेतृत्व करण्यास कोण सक्षम आहे, या प्रश्नावर देवेगौडा यांनी ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबूंची नावे घेतली. अापण स्पर्धेत  नसल्याचेही स्पष्ट केले. पण १९९६ मध्येही तुम्ही स्पर्धेत नव्हतात. ज्याेती बसू, व्ही. पी. सिंग, लालू, मुलायमसिंग यांना मागे टाकून तुम्ही पंतप्रधान झालात, याची आठवण करून दिल्यावर देवेगौडांना हसू आवरले नाही. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्रिपदाचे ‘टॉनिक’ पक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी कर्नाटकात जेडीएसचे किमान दहा खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे. ‘योगा डे’ दिवशी आसने करणाऱ्या देवेगौडांची छायाचित्रे समाज माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली. ८५ वर्षांचा असलो तरी तन- मनाने धडधाकट असल्याचा संदेश त्यांनी दिला. देवेगौडांच्या छायाचित्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकेच ‘लाइक्स’ मिळाले, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...