अटारी/अमृतसर - पाकिस्तानी सैन्याकडून सतत हल्ले होत असल्यामुळे यंदा १४-१५ ऑगस्ट रोजी वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली नाही. मात्र, दोन्ही देशांतील नागरिकांनी एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून शांती अन् प्रेमाचा संदेश दिला. देशप्रेमाने भारलेल्या या नागरिकांच्या घोषणांनी सीमेपार पोहोचून एकता आणि सद्भाव कायम असल्याचा प्रत्यय दिला.
भारतातून "बोले सो निहाल' अशी हाक येताच भारावलेल्या पाकिस्तानी नागरिकांनीही "सत श्री अकाल' म्हणत आपली भावना व्यक्त केली. फोकलोर रिसर्च अकादमी, हिंद-पाक दोस्ती मंच, पंजाब जागृती मंच तसेच साऊद एशिया फ्री मीडिया असोसिएशनने भारतीय हद्दीत विसाव्या हिंद-पाक दोस्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्ताने दहशतवादावर सेमिनारही पार पडला. अगदी याच पद्धतीने भारतीय सीमेपलीकडे साफमा आणि अशाच अनेक संघटनांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दोन्ही देशांतील कटुता कमी होऊन शांतिपर्व सुरू व्हावे, अशी प्रार्थना करत दोन्ही देशांतील नागरिकांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्थानिक कार्यक्रमासह दोन्ही देशांतील संस्थांनी वाघा बॉर्डरवर संयुक्तरीत्या मेणबत्ती मार्चचे आयोजन केले होते. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भारताकडून सतनाम माणक, रमेश यादव, दीपक बाली, राजिंदरसिंह रुबी, जतिंदर बराड, हरेश किडवई, पुष्पिंदर कुलश्रेष्ठ, कमर आगा, रश्मी तलवाड, सतीश झिंगन आदी अटारी बॉर्डरवर पोहोचले. दुसरीकडे गेटच्या समोरच्या बाजूला पाकिस्तानातील इम्तियाज आलम, साईदा दीप, सरमत मंजूर आदी उपस्थित होते. मेणबत्त्या पेटवून दोन्ही देशांतील कार्यकर्ते,
नागरिक गेटजवळ पोहोचताच सर्वांच्याच देशप्रेमाला भरते आले. परस्परांना शुभेच्छा देत त्यांनी शांती अबाधित राहावी, अशी प्रार्थना केली.
...अन् भावनांनी झुगारली बंधने
दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये प्रेमाचे बंध दृढ व्हावेत यासाठी दोन्ही देशांतील अनेक संघटना प्रयत्न करत आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी दोन्ही देशांच्या सीमांवर जमणारे कार्यकर्ते आणि नागरिकांची वाढती संख्या याच प्रयत्नांचा परिपाक आहे. १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री सीमारेषेवर जमलेल्या नागरिकांनी शांती आणि एकतेच्या घोषणा देत आसमंत देशप्रेमाने भारून टाकला. भारतातील कार्यकर्त्यांनी "बोले सो निहाल' असा जयघोष करताच पाकिस्तानी नागरिकांनीही "सत
श्री अकाल' म्हणत आपली भावना व्यक्त केली.