आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 40 कोटी जनतेला मिळाला ‘आधार’; 60 कोटी जनतेची नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा- देशातील प्रत्येक नागरिकाला विशिष्ट ओळख निर्माण करून देणारा आधार कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 60 कोटी जनतेची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 40 कोटी जनतेला आधार कार्ड मिळाले आहेत. मार्च 2014 पर्यंत सर्वांनाच आधार क्रमांक देण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवण्यात येत असून, हा कार्यक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका राज्याच्या माहिती विभागाची राहणार असल्याचे योजना आयोगाच्या आधार प्रकल्पाचे उपमहासंचालक ए. बी. पांडे यांनी सांगितले.

गोवा येथे आधार प्रकल्पांतर्गत विविध राज्यातील माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी आधार नोंदणीबाबत राज्याच्या सहकार्याविषयी संवाद कार्यशाळा झाली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमहासंचालक पांडे बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांकाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख मिळवून देणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

आधार नोंदणीसाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती विभागांनी संपूर्ण सहकार्य करावे तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून आधार कार्ड काढणे महत्त्वाचे असल्यामुळे माहिती विभागाने संवादाचा आराखडा तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणे या कार्यशाळेच्या माध्यमातून अपेक्षित आहे. आधारच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सहज सुलभ झाले आहे. हा कार्यक्रम केवळ भारतातच यशस्वी होत असून, प्रत्येक नागरिकाला बायोमॅट्रिक पद्धतीने विशिष्ट ओळख देत असल्यामुळे भारतातील नागरिकांचा महत्त्वपूर्ण डाटाबेस तयार होत आहे, असेही उपमहासंचालक पांडे म्हणाले.

या वेळी उपमहासंचालक कुमार अलोक, अनिरुद्ध मुखर्जी, राजस्थानचे प्रधान सचिव राजीव स्वरुप यांनीही आधार प्रकल्पाच्या सुरुवातीपासून तर आधार ओळखपत्र प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतच्या कार्याची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रभावी संवादकौशल्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचण्यासाठी करावयाचा माहिती प्रारुप आराखडा विविध राज्यातील माहिती विभागातील अधिकार्‍यांनी या कार्यशाळेत तयार केला.
या वेळी प्रभावीपणे गटप्रमुखांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार माध्यम व संवाद विभागाचे प्रबंधक रणजितरंजन सिन्हा यांनी केले. या वेळी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच योजना आयोगाच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच देशातील माहिती व जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.