आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नरेंद्र मोदींची हवा कुठेच दिसत नाही\', केजरीवालांचा भाजप-काँग्रेस-अंबानींवर हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुकेश अंबानींचे एजंट आहेत. अंबानींच्या हेलिकॉप्टरमध्ये मोदी देशभरात फिरत आहेत. मात्र, रॉबर्ड वाड्रांशी त्यांचे काय संबंध आहेत. वाड्रांच्या विरोधात ते का बोलत नाही, असा सवाल आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कानपूर येथे रॅलीला संबोधीत करताना त्यांनी मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव सरकारवर सडकून टीका केली. यावेळी केजरीवाल यांनी माध्यमांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, 'मोदींची हवा असल्याचे माध्यमातूनच दाखवले जात आहे, मला तर तसे काहीच दिसत नाही. त्यांची हवा कुठेच नाही.'
ते म्हणाले, 'मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही तर देश वाचवण्याचे आवाहन करायला आलो आहे. काँग्रेस आणि भाजपने जमीन, पाणी, जंगल आणि कोळसा वाटून घेतला आहे. अंबानींशी यांची सेटींग झालेली आहे. यांनी देशाचे वाटोळे केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गासाठी यांनी काहीही केलेले नाही. अंबानींच्या हेलिकॉप्टरमधून मोदी फिरत आहेत. ते पंतप्रधान झाले तर, अंबानी त्यांच्या मनाप्रमाणे गॅसचे दर वाढवून घेतील. कारण त्यांनी यांच्या सभांसाठी पैसे पुरविलेले आहेत. मोदींच्या सभेसाठी 50 - 50 कोटी रुपये खर्च होतात. हा पैसा अंबानी देत आहेत.'
आम आदमी पार्टीने गुरुवारी गाझियाबादपासून उत्तरप्रदेशमध्ये 'झाडू चलाओ' यात्रेला प्रारंभ केला. त्याचे रविवारी कानपूरमध्ये समापन होत आहे. यावेळी मंचावर केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, संजयसिंह, कुमार विश्वास आहेत.
गुजरातमध्ये विकास झाल्याच्या वावड्या माध्यमांनी उडविल्या असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, गुजरातमध्ये किती विकास झाला याची पाहाणी करायला मी जाणार आहे. पाच मार्च ते आठ मार्च दरम्यान मी गुजरात दौ-यावर जाणार आहे. माध्यमांनी सांगावे मी कुठे जाऊ. गुजरातमध्ये विकास झाला असले तर, चांगली गोष्ट आहे. आम्हीही तेथून काही शिकून येऊ आणि दिल्लीसह देशभरात ते विकासाचे मॉडेल राबवू. मात्र, खरोखरच तिथे विकास झाला आहे की, नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे.

माध्यमांवर टीका करताना ते म्हणाले, 'दिल्लीत मी धरणे आंदोलन करत होतो तेव्हा माध्यमांनी म्हटले, की केजरीवाल नाटक करत आहे. तेव्हा दिल्लीत कडाक्याची थंडी होती. त्या थंडीत आम्ही रस्त्यावर झोपलो होतो. ते जर नाटक असेल तर यांनी तसे थंडीत रस्त्यावर झोपून दाखवावे.'
केजरीवाल यांनी यावेळी मुकेश अंबानी आणि अनील अंबानी यांच्या स्विस बँकेचा खाते क्रमांक जनतेला सांगितला. ते म्हणाले, मी आयआरएसमध्ये होतो. माझी तिथे चांगली ओळख आहे. तेथील माझ्या मित्रांकडून मी अंबानी बंधूचा स्विस बँकेतील खाते क्रमांक मिळविला. तो तुम्हालाही देतो. 5090160983, 5090160984 हे दोन्ही अंबानींचे खाते क्रमांक आहेत.
संजयसिंह यांनी केजरीवाल यांना वाराणसीमधून लोकसभा लढविण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, केजरीवाल लोकसभा लढविणार की नाही याबद्दल जनता विचारत आहे. मात्र, याबाबत अजून काही ठरलेले नाही. मात्र, आज जाहीर सभेत मी केजरीवालांना आवाहन करतो की, नरेंद्र मोदी जर वाराणसीमधून लोकसभेची उमेदवारी दाखल करणार असतील तर त्यांच्याविरोधात केजरीवाल यांनी आपकडून निवडणूक लढावी. तुम्हाला लोकसभेत पाठविण्याची जबाबदारी आमची आहे.

आम आदमी पार्टीच्या सभेआधी कानपूरमध्ये जोरदार पाऊस आला होता. त्यामुळे सभा स्थळावर पाणी साचले होते. शक्य तेवढे पाणी काढून मैदान सभेसाठी तयार करण्यात आले. पाहा, सभेची आणखी छायाचित्रे पुढील स्लाइडवर.