पणजी - ‘माझी लेखनातील सगळी दैवते ही मराठी साहित्यात आहेत. नाटककार वसंत कानेटकर यांचे एखादे नाटक वाचल्याशिवाय मी कुठल्याही चित्रपटाची कथा लिहीत नाही,’ असे
आपल्या लेखनामागचे गुपित प्रसिद्ध चित्रपटलेखक अभिजात जोशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या अनुषंगाने गोवा येथे सुरू असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आले असता ते बोलत होते.
या वेळी जोशी यांनी वसंत कानेटकर यांच्या प्रत्येक नाटकात मला नेहमीच काही ना काही वेगळेपण जाणवत आले आहे जे मला लेखनासाठी प्रेरणा देत आले आहे. मी स्वत: आधी नाटकच लिहायचो. पण ‘मिशन काश्मीर’च्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रात रुढार्थाने उतरलो नि पुढे विधू विनोद चोप्रा, राजू हिरानी यांनी माझ्यातला लेखक घडवला,’ असे सांगत रोज रात्री पु.ल. देशपांडे यांचे एखादे पुस्तक, कथा, प्रवासवर्णन वाचल्याशिवाय मी झोपत नाही, असेही जोशी यांनी सांगितले.
कथा लिहिण्यास लागली पाच वर्षे
एरवी कुठल्याही चित्रपटाची कथा लिहायला मला किमान दोन वर्षे लागतात पण ‘
पीके’ची कथा लिहायला मला तब्बल पाच वर्षे लागली. इतकी अवघड या चित्रपटाची कथा आहे असे सांगत जोशी यांनी बॉलिवूडला आता बंद खोलीत बसून लिहिणार्या लेखकांची नव्हे तर जग पाहिलेल्या, बाहेरचे अनुभव घेतलेल्या लेखकांची गरज आहे असेही नमूद केले.