पीटीआय - ‘समाजवादी पक्षाला मत न देणारे सच्चे मुस्लिम नाहीत,’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी दुस-याच दिवशी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. ‘सच्चे मुस्लिम कदापिही भाजपला मतदान करणार नाहीत,’ असे त्यांनी शुक्रवारी सांगितले.
‘मुस्लिमांबाबत भाजपची भूमिका नेहमीच निर्दयी व अन्याय करणारी आहे. मग सच्चे मुस्लिम भाजपला मतदान करतीलच कसे? मुलायमसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बाबरीचा विध्वंस होऊ दिला नव्हता,’ याकडेही आझमी यांनी लक्ष वेधले. ‘कधीकाळी उत्तर प्रदेशातील मदरसे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’चे अड्डे मानले जायचे. मात्र समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात असे आरोप करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही,’ असे सांगत त्यांनी मुस्लिम समाज भाजपकडे ओढला जात असल्याच्या दाव्याचेही खंडन केले.
नरेंद्र मोदींच्या सभेच्या वेळी काही बुरखाधारी महिला व दाढीधारी लोक भाजप नेत्यांच्या जवळ बसल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र हे लोक डुप्लिकेट मुस्लिम असल्याचा आरोप आझमी यांनी केला.
भाजपकडून निषेध
दरम्यान, अबू आझमीच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. ‘अशा प्रकारची वक्तव्ये केवळ व्होटबॅँक शाबूत राखण्यासाठी केले जातात,’ असा टोला भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी लगावला. कॉँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनीही आझमींवर टीका केली. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मुस्लिम समाज सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.