आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातेला \"आधार\'चा आधार, कार्डच्या सहाय्याने शोधला हरवलेला मुलगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालदे (केरळ) - १६ वर्षांपासून दुरावलेल्या मुलाचा शोध घेण्यात एका ८० वर्षीय मातेला "आधार'चा आधार प्राप्त झाला. केरळच्या या महिलेला आधार कार्डच्या साहाय्याने मुलगा गोव्याच्या अगुडा मध्यवर्ती कारागृहात असल्याचे आढळून आले.

वयोवृद्ध महिलेचे नाव कल्याणी असून त्या नेदुंबसरी विमानतळानजीकच्या श्रीमूलंगरम गावची रहिवासी आहे. मुलगा व्ही. व्ही. मोहन १६ वर्षांपूर्वी गोव्यात नोकरीच्या शोधात गेला होता. पती व दोन मोठ्या मुलांच्या निधनानंतर शेजारी कल्याणी यांची देखभाल करत होते. कल्याणी यांचे वाढते वय व अंधुक दृष्टीमुळे मुलगा भेटण्याची आशा त्यांनी सोडली होती. मात्र, या स्थितीत त्यांना आलेल्या टपालाचा मोठा आधार मिळाला. काही आठवड्यांपूर्वी मिळालेला टपालाचा लिफाफा घेऊन त्या श्रीमूलंगरम ग्रामपंचायतचे सरपंच के. सी. मार्टिन यांच्याकडे गेल्या. मार्टिन यांनी ते उघडल्यानंतर त्यात मोहनचे आधार कार्ड असल्याचे दिसून आले. मात्र, कल्याणी यांच्याकडे त्याचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे मार्टिन व काही नातेवाइकांनी चौकशी केली तेव्हा मालकाचा खून केल्याप्रकरणी मोहन १३ वर्षांपासून तुरुंगात असल्याचे दिसून आले.
मालकाच्या खुनातून तुरुंगवास
मोहन गोव्यात आल्यानंतर काही दिवसांत त्याला फर्निचर बनवणाऱ्या कारखान्यात नोकरी मिळाली. यादरम्यान रागाच्या भरात त्याने कर्नाटकचा रहिवासी असलेल्या मालकाचा खून केला. गोवा उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती पणजी केरळ समाजाचे अध्यक्ष लालू अब्राहम यांनी दिली. मार्टिन यांनी गेल्या शनिवारी मोहनची कारागृहात भेट घेतली. विशेष म्हणजे मोहनला भेटण्यासाठी गेल्या १३ वर्षांत कोणीच आले नव्हते, शिवाय त्याने पॅरोलवर जाण्याची इच्छाही व्यक्त नाही, याबद्दल तुरुंग प्रशासनाने आश्चर्य व्यक्त केले.