आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला यांची हकालपट्टी करण्याची तयारी; अण्णा द्रमुकची लवकरच होणार बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक लवकरच बोलावण्यात येणार असून तीत पक्षाच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांची हकालपट्टी करण्यात येईल. पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे नेते दिनकरन यांची १० ऑगस्ट रोजीच उपसरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या पदांमध्ये केलेले बदल अवैध आहेत, असा ठरावही बैठकीत मंजूर झाला.  

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अद्रमुकची बैठक झाली. या बैठकीला मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या दिवंगत प्रमुख जयललिता यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा कुठलाही अधिकार दिनकरन यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या घोषणा पक्षावर बंधनकारक नाहीत, असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. 
 
या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, दिनकरन यांची १० ऑगस्टच्या बैठकीत उपसरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. शशिकला यांनी तुरुंगवासात रवाना होण्याआधी दिनकरन यांची उपसरचिटणीस पदावर केलेली नियुक्ती पक्षाच्या नियमांनुसार नाही. त्याशिवाय निवडणूक आयोगानेही त्यांची नियुक्ती मान्य केेलेली नाही. जयललिता यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी तसे दिनकरन यांना सांगितले आहे. जयललिता यांनी नियुक्त केलेले आणि संघटनात्मक निवडणुकीतून निवडून आलेले  पदाधिकारी आपापल्या पदांवर कायम राहतील. बैठकीला दिनकरन यांना पाठिंबा देणारे २१ आमदार वगळता पक्षाचे काही खासदार आणि आमदार अनुपस्थित होते.  

आपल्याला २१ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला असून, मुख्यमंत्री पलानीस्वामी अल्पमतात असल्याने त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

बैठक बोलावण्याचा अधिकार सरचिटणीसांनाच : पलानीस्वामी गट  
दिनकरन यांच्या गटाने आज मंजूर झालेल्या ठरावांवर टीका केली आहे. पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक बोलावण्याचा अधिकार फक्त पक्षाच्या सरचिटणीसालाच आहे, असा दावा या गटाने केला. आजच्या बैठकीला आम्हाला बोलावण्यात आले नव्हते, असेही या गटाने स्पष्ट केले आहे.  

दिनकरन यांनी आणखी एका मंत्र्याची केली हकालपट्टी  
टीटीव्ही दिनकरन यांनी ऊर्जामंत्री पी. थंगमणी यांची नमक्कल जिल्हा सचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी ए. अनबझगन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्रमुकमध्ये पक्षाचे जिल्हा सचिव पद महत्त्वाचे मानले जाते. दिनकरन यांनी रविवारीच मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना सालेम जिल्हा सचिव पदावरून हटवले होते.
बातम्या आणखी आहेत...