आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रमध्ये आज धडकणार चक्रीवादळ; मदत कार्यासाठी हवाई दल, लष्कराचे जवान तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: श्रीकाकुलम किना-यावर स्थानिकांनी समुद्रदेवतेला साकडे घातले.
हैदराबाद/भुवनेश्वर/नवी दिल्ली - हुदहुद या चक्रीवादळाच्या तडाख्याच्या भीतीने आंध्र प्रदेश आणि ओडिशातील सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ रविवारी सकाळी ताशी १९५ किलोमीटर वेगाने विशाखापट्टणमला धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणा-या सुमारे ४० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने ७५ रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
हवामान खात्यानुसार, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रच्या किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळी वादळ विशाखापट्टणमहून २५०, तर ओडिशाच्या गोपालपूरहून ३५० किलोमीटरवर होते.

हा आहे धोका : चक्रीवादळ समुद्रकिना-यावर येऊन धडकल्यानंतर हवेचा वेग ताशी १९० ते १९५ किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा धोका आहे. विद्युत पुरवठा ठप्प होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प होण्याची भीती आहे.

वादळाचा धोका
आंध्र : पूर्व गोदावरी, श्रीकाकुलम, पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, विजियानगरम.
ओडिशा : कोरापूट, मलकानगिरी, नबरंगपूर, रायगडा, गजपती, गंजम.