चेन्नई- चेन्नई एअरपोर्टवर एअर इंडियाचे विमान एआय 143 चा पायलट आणि फ्लाइट इंजिनिअरमध्ये शनिवारी फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल दोन तास एअरपोर्टवर ताटकळत थांबावे लागले. याप्रकरणी एअर इंडियाने चौकशीचे आदेश दिले असून पायलट माणिकलाल याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, पायलट माणिकलाल आणि फ्लाइट इंजिनिअर कानन या दोघांमध्ये हाणामारी झाली. माणिकलाल याने कानन याच्या नाकावर एक ठोसा लगावला. त्यामुळे त्याच्या नाकातून रक्त भडाभडा वाहू लागले. त्यानंतर माणिकलाल याने कॉकपिटमध्ये स्वत:ला काही काळासाठी कोंडून घेतले होते. जखमी कानन याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या सगळ्या प्रकारामुळे एअर इंडियाचे विमान तब्बल दोन तास एअरपोर्टवरच उभे होते. त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पायलट माणिकलाल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पायलटची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.