आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्निचर पॉलिश करणाऱ्या पावडरला म्हटले विस्फोटक; योगी सरकारकडून पोलिसांचा गैरवापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके आढळल्याच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी योगी सरकारला चांगलेच फटकारले. माजी आमदारांनी विधानभवनात येऊ नये म्हणून योगी सरकारने फर्निचर पॉलिश करणाऱ्या पावडरला पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट (पीईटीएन) असे म्हटले होते, अशी टीका अखिलेश यांनी केली. उत्तर प्रदेश सरकार समाजवादी कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करत आहे आणि त्यांच्याविरोधात बनावट गुन्हे दाखल करत आहे, असा आरोपही अखिलेश यांनी केला.  

अखिलेश यादव म्हणाले की, आमचे सरकार सत्तारूढ असताना समाजवादी पक्ष पोलिस ठाणे चालवत होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेते करत होते. आता भाजप सरकार विरोधकांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे. आम्ही याबाबत राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करू.  अखिलेश यांनी औरैया जिल्ह्यातील एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, भाजपला तेथे आपला जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा आहे. त्यासाठी सपाचे जिल्हा परिष्द सदस्य कल्लू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. यादव यांना बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची तक्रार राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.

विधान परिषदेच्या सदस्यांनी सपाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर अखिलेश म्हणाले की, भाजप नेते घाबरले आहेत हे यावरून दिसत आहे. निवडणुकीचा सामना करण्याची त्यांची इच्छा नाही. विधान परिषदेत जाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सपाच्या सदस्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे.  

सपाचे विधान परिषदेचे आमदार यशवंत सिंग व बुक्कल नवाब यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर अखिलेश म्हणाले की, एकाला गृहनिर्माणमंत्री, तर दुसऱ्याला महसूल व वाहतूकमंत्री केले जाणार असल्याची माहिती आमच्याकडे आहे. भाजपमध्ये गेल्याने आता हे दोघे स्वच्छ झाले आहेत. समाजवादी लोहिया ट्रस्टमधून आपल्या चार जवळच्या सदस्यांना हटवल्याच्या मुद्द्यावर अखिलेश म्हणाले की, त्यामुळे कुठलाही फरक पडत नाही. माझ्यावर औरंगजेब असल्याचा आरोपही होत आहे. माझ्यापासून सावध राहा.

असे आहे प्रकरण 
गेल्या १२ जुलै रोजी विधानसभेत पावडरचे एक पाकीट आढळले होते. ते पीईटीएन हे धोकादायक प्लास्टिक स्फोटक असल्याचे सांगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी एनआयएमार्फत करण्याची घोषणा केली होती. तसेच याप्रकरणी कलम १२० ब आणि १२१ अ नुसार एफआयआरही नोेंदवला होता.
बातम्या आणखी आहेत...