आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhilesh Yadav Woos Brahmans In UP, Promises To Withdraw False

बसपाच्या काळात ब्राह्मणांवर खोटे गुन्हे : अखिलेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - मागच्या बसपा सरकारच्या कार्यकाळात ब्राह्मण आणि सवर्ण वर्गातील लोकांवर सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी केला. त्याचबरोबर हे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासनही यादव यांनी दिले.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी बसपाने 18 ब्राह्मण नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.या पार्श्वभूमीवर ब्राह्मण व उच्चवर्णीयांना आकर्षित करण्यासाठी सपानेही हे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. रविवारी अखिलेश ब्राह्मण संमेलनास उपस्थित राहीले.त्यावेळी ते बोलत होते. मागील सरकारच्या कार्यकाळात ब्राह्मणांवर खोटे गुन्हे दाखल झाले होते. तुमच्यापैकी अनेकांना तुरुंगातदेखील जावे लागले होते. परंतु आमचे सरकार काही गुन्हे मागे घेणार आहे, अशी ग्वाही देतो. ब्राह्मण समुदायाचा सन्मान कायम राहावा यासाठी सपा सरकार कटिबद्ध आहे. समुदायाच्या प्रगतीसाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.संस्कृत शिक्षकांचा प्रश्न एका महिन्यात सोडवण्यात येईल.

संस्कृतचे संरक्षण आणि जतन म्हणजेच भारतीय संस्कृतीचे जतन होय. बसपावर हल्ला करताना यादव म्हणाले, 2012 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. तरीही समाजवादी पार्टीने बहुमत मिळवले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अशा प्रकारचे परिवर्तन पाहायला मिळेल. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव, विधानसभा अध्यक्ष माता प्रसाद यांच्यासह अनेक धार्मिक नेत्यांची भाषणे झाली.

विकासाचे धोरण
ऊर्जा निर्मिती, नवीन उद्योगांची उभारणी, रस्त्यांची निर्मिती, सरकारमधील रिक्त जागांची भरती अशा विकासाच्या विविध योजना सपा सरकारने तयार केल्या आहेत. पोलिस, शिक्षण व इतर विभागातील भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली.