अमरनाथ- बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह दहशतवादालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. १० जुलै रोजी अनंतनागमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीच भाविकांची संख्या घटली. मात्र, तिसऱ्या दिवशी १२ हजार भाविक येथे पोहोचले. सरासरी दररोज ८ हजार भाविक दर्शन घेत आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण यात्रेत अंदाजे २ लाख २० हजार लोक पोहोचले. यंदा यात्रा ७ ऑगस्टपर्यंत आहे. आतापर्यंत २ लाख १० हजार ७२९ भाविकांनी दर्शन घेतले. इंदूरहून आलेल्या विपिन यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना आम्ही घाबरत नाही, हा संदेश देणार आहोत. दगडफेक आणि जागोजागी सुरक्षा नाके बसवल्याने काश्मीर खोरे पाहणे शक्य नाही.
बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह प्रचंड असून स्थानिक लोकही तितक्याच हुरूपाने काम करत आहेत. येथील लोक पालखी आणि खेचरांवर प्रवाशांना दर्शन स्थळापर्यंत नेतात. कुली आणि गाइडचे कामही तेच करतात. फूल-प्रसाद, खाण्या पिण्याची सुविधा, सुकामेवा विक्री आणि काश्मिरी कपड्यांची त्यांची दुकाने येथे आहेत. या यात्रेतून मिळणाऱ्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. यंदा अत्यधिक सुरक्षा, तपास नाके असल्याने त्यांना पर्यटकांची उणीव भासत आहे. दाल सरोवरात शिकारा चालवणारे ५३ वर्षीय मुहंमद सांगतात की, यात्रेला सुरक्षेचे कवच नसताना अनेक भाविक परतताना मोठ्या संख्येने येथे भेट देत. अनेकदा शिकारेच कमी पडत. पर्यटकांना शिकाऱ्यातून रपेट मारण्यासाठी खूप वाट पाहावी लागत असे. एक वर्षापासून पर्यटक नाहीत. आता दररोज २-३ पर्यटक मिळतात. त्यांनाही निम्म्या दरात फिरवावे लागते. पूर्वी एका फेरीसाठी ६०० रुपये कमाई होत होती. आता १५० रुपये मिळतात. यासाठी दहशतवादी आणि दगडफेक करणारे जबाबदार असल्याचे ते म्हणाले. भाविक आणि पर्यटक आले तरच कमाई शक्य आहे. तेच आमचे सर्वस्व आहेत.
अशीच परिस्थिती अमरनाथ यात्रेचीही आहे. पहिले २-३ दिवस यात्रेत निश्चित दरापेक्षाही अधिक रक्कम घेऊन घोडे चालवणारे आता हजार रुपयांत एक फेरी करत आहेत. यात्रा समितीने निश्चित केलेला दर साडेतीन हजार रुपये आहे. गेल्या १५ वर्षांपासून घोडा हाकणारे अब्दुल सांगतात की, दगडफेक आणि दहशतवादामुळे मोठे नुकसान झाले आहे. या दोन महिन्यांच्या कमाईत आमचा वर्षभराचा खर्च चालवला जातो. सोनमर्गचे सरपंच नजीर अहमद शेख यांचे म्हणणे आहे की, असे हल्ले हे राजकीय नेत्यांचे कारस्थान आहे. काश्मिरी लोकांची प्रतिमा खराब केली जात आहे. ते सांगतात की, यंदा प्रत्येक जण अधिकाधिक प्रयत्न करत आहे. राज्याबाहेर होत असलेली प्रतिमा बदलण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
अमरनाथ दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रियाही या वेळी जाणून घेतल्या. ग्वाल्हेरच्या निवासी ६३ वर्षी प्रज्ञा गंगाजली पतीसह बाबा बर्फानीचे दर्शन घेऊन परतत होत्या. पावसामुळे येथे चिखल झाला आहे. प्रवासादरम्यान त्या जखमी झाल्या. अशा अडचणी भाविकांना सोसाव्या लागत आहेत. येथील रस्ते जोखमीचे आहेत. श्रीनगर ते सोनमर्गपर्यंतचा रस्ता चांगला आहे. त्यापुढे कच्चा रस्ता आहे. गगनगिरी काश्मीरच्या या परिसरातील शेवटचे गाव आहे. येथे १२ महिने लोकांची वसाहत आहे. याच्या थोडे पुढे अमरनाथला जाणारा रस्ता आहे. तेथे कधीच रस्ता बांधला नाही. रंगा वळणावरील तुटका मार्ग राष्ट्रीय महामार्ग - १ एचा भाग आहे. येथे पडलेल्या खडीवरून कोणी वाहन वेगाने हाकले तर सरळ सिंधू नदीमध्ये पडेल. परतीचा लेह मार्गे येणारा रस्ता चांगला आहे.
बिहारहून यात्रेसाठी आलेल्या एका गटात प्रेमनाथ केसरी भेटले. त्यांनी सांगितले की, पावसामुळे चिखल झाला आहे. पकडण्यासाठी रेलिंग नाही. त्यांच्याच गटातील दुर्गावती देवींना हृदयविकाराचा झटका आला. तेथे चांगला उपचार मिळाल्याने जीव वाचला. रस्त्यात पेयजलाची सोय नसल्याने त्यांची अडचण झाली. याच गटातील एक भाविक दिवाकर अर्ध्या रस्त्यातूनच परतले. त्यांनी तीन मृतदेह आणताना पाहिल्याने त्यांची पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. ऑक्सिजनची कमतरता हे मृत्यूचे महत्त्वाचे कारण आहे. घोड्यावरून पडल्याने अनेक जणांचे जीव जातात. यंदा २२ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच लंगर लावणारी विश्वस्त मंडळे येथे पोहोचतात. ही मंडळी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाबमधून येतात. श्री अमरनाथ यात्रा वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास शर्मा सांगतात की, यंदा लंगर लावणाऱ्या गटांवर दगडफेक झाली. यामुळे सेवेकरी येथे थांबू इच्छित नाहीत. सामान लंगरस्थळापर्यंत पोहोचते करण्यासही भीती वाटते. पहलगामच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात लंगरसाठी जागाही कमी दिली जाते.
३० हजार टॅक्सी; निम्म्या किमतीतही पर्यटक मिळेनात
टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्सच्या संघटनांचे अध्यक्ष गुलाम नबी यांनी सांगितले की, भाविक आमचे अतिथी आहेत. त्यांच्यावर हल्ला भ्याडपणा आहे. येथे ३० हजार टॅक्सी आहेत. हे दोन महिने महत्त्वाचे असतात. भाविक पवित्र गुहेतच जातात असे नव्हे, तर वैष्णोदेवी, गुलमर्ग, लडाख, पटनी टॉपलाही भेट देतात. मात्र, ९०% टॅक्सींना पर्यटक मिळेनात. यावर्षी १०% बिझनेस झालाय. निम्म्या दरात काम करावे लागत आहे. पूर्वी एका पर्यटकाकडून २ ते अडीच हजार रुपये मिळत. आता हजार रुपये मिळत आहेत.
२०१६ मध्ये राज्याला १६ हजार कोटी रुपयांचे नुकसान
- ८०% पर्यंत कमी झाली कमाई
- जम्मू- काश्मीर सरकारच्या सर्व्हेनुसार २०१६ मध्ये २०१५ च्या तुलनेत ५५% कमी पर्यटक आले. यामुळे राज्याला १६ हजार कोटींचे नुकसान झाले.
- वर्ष २०१५ मध्ये १३ लाख पर्यटक काश्मीरला आले होते, तर २०१६ मध्ये काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या ५५% कमी झाली.
- स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांना २७६ कोटींचे आणि दुसऱ्या व्यावसायिकांना १९० कोटींचे नुकसान झाले.
- एका अंदाजानुसार खोऱ्यातील अंदाजे १.५ ते २ लाख लोक पर्यटन व्यवसायात आहेत.
- ३३ एकरांत पसरलेल्या ट्युलिप गार्डनमध्ये पर्यटक घटले आहेत. यंदा १००० पर्यटकांनीच भेट दिली.
ही यात्रा पूर्ण करण्यास ५-६ दिवस लागतात
पहलगामपासून गुहेचे अंतर ४६ किमी आहे. हा पायी जाण्याचा मार्ग आहे. यासाठी ३ ते ५ दिवस लागतात. दुसरा रस्ता सोनमर्गच्या बालटालहून जातो. येथून अमरनाथ गुहेचे अंतर केवळ १६ किलोमीटर आहे. मात्र, चढण दुर्गम असल्याने हा मार्ग कठीण आहे.