आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा पुन्हा ‘रामबाण’! अमित शहा अयोध्येत, भव्य मंदिर उभारणीचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - अयोध्येतील ज्या राममंदिराने भारतीय राजकारणाला कलाटणी दिली तो मुद्दा भाजपने 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे. आक्रमकतेमध्ये नरेंद्र मोदी यांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते व पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी अमित शहा यांनी शनिवारी अयोध्येला भेट देऊन भव्य राममंदिर उभारण्याची घोषणा केली.

वादग्रस्त क्षेत्राचा दौर करून शहा यांनी श्रीरामाची पूजा केली. मंदिराबाहेर येताच उपस्थितांनी त्यांना विचारणा केली की, प्रभू श्रीरामाला काय मागितले? शहा यांनी मोदी स्टाइल उत्तर दिले. ते म्हणाले, ‘लवकरात लवकर येथे भव्य मंदिर उभारण्याची शक्ती दे, असा आशीर्वाद मागितला. काँग्रेसपासून देशाला मुक्त करण्याचीही प्रार्थना केली.’

देशात सुशासन यावे म्हणून राममंदिराची उभारणी हे पक्षाचे लक्ष्य असल्याचे शहा म्हणाले. नंतर कारसेवकपुरममध्ये त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी कानमंत्रही दिला.

मोदीही दरबारात
मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथसिंह यांच्यानंतर आता पक्षाच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख नरेंद्र मोदी संघ दरबारात येणार असल्याची चर्चा सध्या नागपुरात आहे. मात्र, तारीख अजून निश्चित झालेली नाही.

पुन्हा पहिले पाढे..
1. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भारतीय जनता पक्ष 17 वर्षांनी आजही कायम असल्याचे संकेत भाजपला यातून द्यावयाचे आहेत. म्हणूनच शहा पहिल्यांदा अयोध्येत दाखल झाले.
2. कारसेवकपुरम हे राम जन्मभूमी आंदोलनाचे कायम केंद्र राहिले होते. नेमक्या याच ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
3. लालकृष्ण अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी घटनेतील 370 व्या कलमाचा मुद्दा उपस्थित केला होता. बिहारमध्ये जदयूपासून काडीमोड घेतल्यानंतर पक्ष पुन्हा मूळ अजेंड्याकडे वळत आहे.

केंद्रात बहुमत हवे
शहा यांच्यासमवेत या वेळी उपस्थित भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी राममंदिर उभारणीसाठी केंद्रात भाजपला बहुमत मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ते वक्तव्य ऐकले नाही : राजनाथसिंह
नागपूर : अमित शहा यांनी अयोध्येत केलेले वक्तव्य आपण अजून ऐकले नसल्याचे भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी येथे सांगितले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी ते शनिवारी नागपूरमध्ये होते.
गेल्या गुरुवारी मुरलीमनोहर जोशी, शुक्रवारी लालकृष्ण अडवाणी यांनी भागवत यांची भेट घेतली होती. सलग तिसर्‍या दिवशी राजनाथसिंह यांच्या रूपाने भाजपचे तिसरे ज्येष्ठ नेते संघाच्या दरबारात हजर होते.