राजामुंदरी (आंध्र प्रदेश)- "गोदावरी पुष्करम' मेळ्यातील गर्दीच्या घाटांवरून दूर ठेवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने येथील भिकाऱ्यांसमोर अनोखा प्रस्ताव ठेवला आहे. घाटावर येऊन भीक न मागण्यासाठी त्यांनी भिकाऱ्यांना १० हजार रुपये देण्याची योजना आणली आहे.
दक्षिण भारतातील कुंभमेळा समजल्या जाणारा १२ दिवसांचा हा गोदावरी पुष्करम मेळा २५ जुलैपर्यंत चालणार आहे. मेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने येथे भिकाऱ्यांची संख्याही प्रचंड असते. त्यामुळे उगाचच घाटांवरील गर्दी वाढते. भाविकांना भिकाऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गोदावरी पुष्करम आयोजन समितीचे अध्यक्ष पी. नारायण यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यासाठी प्रशासनाला २०० भिकाऱ्यांची ओळख पटली आहेे. मात्र, सध्या शहरांत ३ हजार भिकारी आहेत. शिवाय, १० हजार रुपयांच्या आमिषामुळे अनेक जणांनी आपण भिकारी असल्याचा दावाही केला आहे. या दाव्यामुळे प्रशासनासमोर आता एक नवीनच अडचण निर्माण झाली आहे.