आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅनिमेशन थेरपीद्वारे इंजेक्शनची भीती होणार कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - बेनटेन, छोटा भीम, डोरेमॉन यांसारख्या बच्चेकंपनीच्या आवडत्या कार्टून पात्रांच्या मदतीनेच मुलांचे वैद्यकीय उपचाराविषयीचे भय दूर केले जाणार आहे. इंजेक्शन देताना मुलांना वाटणारी भीती आणि वेदना कमी करण्यासाठी चंदिगडमधील अत्याधुनिक पीडियाट्रिक सेंटरने (एपीसी) कार्टूनचा वापर केला आहे. या नव्या पद्धतीला ‘अ‍ॅनिमेशन थेरपी’ असे नाव दिले आहे.
पीजीआय नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या डॉ. संध्या घई, पीडियाट्रिक सर्जरीच्या प्रो. केएलएन राव, डॉ. सुखविंदर सिंह आणि जीना जेम्स यांनी दोन महिने प्रयोग केल्यानंतर ही उपचार पद्धती विकसित केली आहे. 3 ते 6 वर्षांच्या मुलांवर या पद्धतीचा प्रयोग करण्यात आला.
डॉ. संध्या घई यांनी सांगितले की, मुलांना तपासणी आणि उपचारादरम्यान वेदना होऊ शकतात. सलाइन लावताना किंवा तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतानाही वेदना होतात. त्यामुळे मुले आधीच घाबरलेली असतात. मुलांच्या भीतीमुळे पालकही त्रस्त असतात. विदेशात मुलांमधील भीती घालवण्यासाठी महागडी अत्याधुनिक पद्धती वापरली जाते. मात्र, आम्ही कमी खर्चात अ‍ॅनिमेशन थेरपीचा वापर मुलांवर करण्याचा निर्णय घेतला.
अ‍ॅनिमेशन थेरपीचे टप्पे
50 मुलांवर दोन महिने करण्यात आलेल्या अ‍ॅनिमेशन थेरपीच्या प्रयोगात पुढीलप्रमाणे तीन टप्पे आहेत.
पहिला टप्पा : इंजेक्शन देताना किंवा एखाद्या वाहिनीतून रक्त काढण्यापूर्वी काही मुलांना अर्धा तास त्यांचे आवडते कार्टून दाखवण्यात आले. तसेच इंजेक्शन देण्यासाठी आलेल्या मात्र कार्टून शो न दाखवलेल्या मुलांचेही निरीक्षण करण्यात आले. कार्टून पाहणा-या 10 टक्के मुलांमध्ये इंजेक्शनची भीती होती. कार्टून न पाहिलेली 54 टक्के मुले घाबरलेली होती.
दुसरा टप्पा : इंजेक्शन देताना मुलांची प्रतिक्रिया पाहण्यात आली. कार्टून पाहिलेल्या 42 % मुलांना भीती आणि वेदना जाणवल्या, तर कार्टून न पाहिलेल्या मुलांनी 84 टक्के त्या जाणवल्याची तक्रार केली.
तिसरा टप्पा : कार्टून पाहिलेल्या 30 % मुलांनी वेदना जाणवत असल्याचे सांगितले, तर कार्टून न पाहिलेल्या 70% मुलांनी वेदना आणि भीती जाणवल्याची तक्रार केली.