आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांत जुंपली : शशिकलांसाठी बंगळुरूच्या तुरुंगामध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात बंगळुरूच्या कारागृहात असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना विशेष सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप कर्नाटकच्या एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने केला आहे. कर्नाटकच्या पोलिस उपमहासंचालक (तुरुंग प्रशासन) डी. रूपा यांनी १० जुलै रोजी या कारागृहाची तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी कर्नाटकचे पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) एच. एस. सत्यनारायणा राव आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांंना याबाबतचा चार पानी अहवाल सोपवला आहे. तुरुंगातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून शशिकला यांना व्हीव्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शशिकला यांच्यासाठी तुरुंगात खास स्वयंपाकगृह बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व आपल्या आदेशावरून सुरू असल्याचे सांगितले जात असून यासाठी २ कोटी रुपयांची लाचही देण्यात आल्याची अफवाही कानी पडली आहे. आपल्यावर अशा प्रकारचे आरोप होत असल्यामुळे आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, असेही रूपा यांनी राव यांना यात म्हटले आहे. बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात शशिकला फेब्रुवारी महिन्यापासून कैदेत आहेत. त्यांच्यासोबत व्ही. एन. सुधाकरण आणि इलावरासी यांनाही ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.   
 
शशिकला यांनाही सामान्य कैद्यांप्रमाणेच ठेवले जाते, सुविधा नाही  
डी. रूपा यांनी अहवालातून केलेले आरोप पोलिस महासंचालक राव यांनी फेटाळले आहेत. ‘रूपा यांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि खोटे आहेत. शशिकला  यांच्यासाठी कारागृहामध्ये कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र स्वयंपाकघर बनवण्यात आले नसून त्यांना कोणत्याच व्हीव्हीआयपी सुविधा पुरवल्या जात नाहीये. रूपा यांनी केलेल्या आरोपाविरोधात मी कायदेशीवर कारवाई करणार आहे. शिवाय, या प्रकरणी कोणत्याही चौकशीस सामाेरे जाण्यास मी तयार आहे.’ असे एच. एस. सत्यनारायणा राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 
 
२५ कैद्यांची ड्रग चाचणी पॉझिटिव्ह  
१० जुलैच्या तपासणीत डी. रूपा यांना २५ कैदी मादक द्रव्यांचे सेवन करताना आढळले होते. त्यापैकी १८ कैद्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून त्यांनी या सर्व कैद्यांची नावे तसेच त्यांच्या शरीरातील मादक द्रव्यांच्या तत्त्वांचा तपशील अहवालात दिला आहे. बहुतांश कैद्यांच्या शरीरात गांजाचे अंश सापडले असल्याचे रूपा यांनी म्हटले आहे.  
 
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अारोप-प्रत्यारोपांच्या  फैरी
डीआयजी राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत डी. रुपा यांच्यावर आरोप केले की, परवानगी नसतानाही मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोडून त्या तुरुंग पाहणीस गेल्या. त्यांना याबाबत दिलेल्या मेमोचा खुलासा न पाठवता त्यांनी पाहणीचा अहवाल दिला आहे. दरम्यान, आपण केलेल्या आरोपांत तथ्य वाटत नसल्यास पुन्हा चौकशी करावी, असे रूपा यांनी म्हटले आहे.  
 
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, शशिकला यांना तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात असल्याची बाब आम्ही गांभीर्याने घेतली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. 
 
तेलगीचा राजेशाही थाट, कैद्यांकडून सेवा  
डी. रूपा यांनी मुद्रांक घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड अब्दुल करिम तेलगीला दिल्या जात असलेल्या सुविधेबाबतही खुलासा केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तेलगीला सहा महिन्यांपूर्वी चालण्या-फिरण्यासाठी व्हीलचेअर देण्यात आली होतीे. मात्र, तो तुरुंगात तंदुरुस्त असून बिनबोभाटपणे सर्वत्र फिरतोय. त्याच्यासोबत तुरुंगात असलेल्या कच्च्या कैद्यांकडून तो हातपाय दाबून घेतो तसेच अन्य कामेही करवून घेतो, असे रूपा यांनी अहवालात म्हटले आहे. यासाठी त्यांनी तुरुंगातील सीसीटीव्ही पाहण्याचाही संदर्भ दिला आहे.  
बातम्या आणखी आहेत...