आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Cross LoC Wedding: Groom From Uri, Bride From Chinari

सरहद्दही रोखू शकली नाही खर्‍याखुर्‍या प्रेमाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - हृदयीच्या नात्यांना सरहद्दींनाही रोखता येत नाही. भारताचा इरफान आणि पाकिस्तानची इस्मा यांचा विवाह हे त्याचे उदाहरण सांगता येईल. त्यांचा विवाह दोन्ही देशांतील संबंधाला दर्शवणारा ठरला आहे.

खरे तर २५ वर्षीय मोहंमद इरफान आणि २४ वर्षीय इस्मा बशीर यांच्या घरांतील अंतर केवळ २८ किलोमीटरचे; परंतु इस्माशी विवाह करण्यासाठी इरफानला ११०० किलोमीटर प्रवासाच्या दिव्यातून जावे लागले. इरफान आणि इस्मा यांचा गेल्या रविवारी विवाह पार पडला. इरफानचे कुटुंब जम्मू-काश्मीरच्या उडी जिल्ह्यातील सलामाबाद भागात राहते. तेथून सरहद्द केवळ १८ किलोमीटर आहे. इस्मा मात्र पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादच्या चिनारीमध्ये राहते. तेथून सरहद्द १० किलोमीटर आहे. विवाहासाठी आम्हाला ट्रान्स-एलओसी परवाना काढावा लागला होता; परंतु त्यांना पंजाबच्या अटारी-वाघा सीमेवरून मुजफ्फराबादला जावे लागले. कारण श्रीनगर -मुजफ्फराबाद बससेवा बंद आहे. तो मार्ग सुरू असता तर त्यांना वधू पक्षाकडे केवळ तासाभरात पोहोचता आले असते; परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना चार दिवस प्रवास करावा लागला, अशी माहिती इरफानचे वडील मोहंमद युसूफ यांनी दिली. दोन्ही देशांतील सरकारांनी सीमेवरील विवाहासाठी व्हिसा आणि प्रवासाच्या नियमांत शिथिलता आणली पाहिजे, असे इरफानला वाटते.

बससेवा बंद
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ७ एप्रिल २००५ रोजी श्रीनगर आणि मुझफ्फराबाद यांदरम्यान कारवां-ए-अमन बस सुरू केली होती; परंतु नंतर ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातून संत्रे घेऊन आलेल्या ट्रकमधून अमली पदार्थांची ३०५ पाकिटे भारतीय लष्कराने जप्त केली व चालकास अटक केली होती. त्या घटनेनंतर मात्र पाकिस्तानला जाणारी ही बससेवा बंद करण्यात आली.

इजिप्तमध्ये भुयारातून सीमा ओलांडून विवाह
इजिप्त आणि पॅलेस्टाइनचे लोक आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी सीमेवर तयार करण्यात आलेल्या भुयारांचा बेकायदा वापर करतात. अशा प्रकारे भुयारी मार्गे सीमेपलीकडे जाऊन विवाह केला जातो. सरकारने अशा गुपचूप विवाहांना मान्यता दिलेली नाही; परंतु त्यावर कडक निगराणी ठेवण्यात येते. लोक विवाह पार पडल्यानंतर भुयारी मार्गे पुन्हा मायदेशी परततात.