जम्मू - जम्मू जिल्ह्यात भारत-पाकदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक अरनिया भागामध्ये शुक्रवारी सकाळी घुसखोर दहशतवादी व सुरक्षा दलांचा संघर्ष सुरू झाला. या भागात लपलेल्या अखेरच्या दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातले. दरम्यान, कारवाईत पाच सामान्य नागरिकांसह १२ जणांचा मृत्यू झाला.
गुरुवारी बंकरमध्ये दडून बसलेल्या या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या दीर्घ चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. या कारवाईत तीन जवानही शहीद झाले. शिवाय तीन नागरिकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी जवानांनी पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. यात बंकरमध्ये दडून बसलेला आणखी एक दहशतवादी मारला गेला.
दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत असलेल्या एका रिकाम्या बंकरचा ताबा घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ही घुसखोरी हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्करातील जवानांनी धडक कारवाई करत हे बंकरच उद््धवस्त केले. दरम्यान, घुसखोरीचा प्रयत्न करणार्या चार संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर अटक केली असून त्यांच्याकडून चार एके-४७, ६ ग्रेनेड, ४०० काडतुसे, एक पिस्तूल आणि पाकिस्तानी चलनाचे आठ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा
नरेंद्र मोदी शुक्रवारी उधमपूर आणि पुंछ जिल्ह्यात जाहीर सभा घेणार असल्याने सीमा सुरक्षा दलाने जम्मू शहर, उधमपूर आणि पुंछ जिल्ह्यात चोख बंदोबस्त होता. काश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी पाकिस्तानी हद्दीतून ही घुसखोरी सुरू असून सीमा सुरक्षा दल सतर्क झाले आहे.