बंगळुरू- केंद्रीय रेल्वेमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. बंगळुरु कोर्टाने गुरुवारी कार्तिकविरूद्ध अटक वॉरंट जारी केली. तसेच कार्तिक विदेशात पळून जाण्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर कार्तिकविरुद्ध लुकआऊट नोटीसही बजावली जाणार आहे.
मिळालेली माहिती अशी की, कार्तिकला पोलिसांनी यापूर्वी दोनदा नोटीस बजावली होती. तरीही कार्तिक कोर्टात हजर झाला नाही. अखेर कोर्टाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. तसेच कार्तिक विदेशात पळून जाण्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे कार्तिकला लुकआउट नोटीस बजावण्याबाबत पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने मान्य केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी पीडित अभिनेत्री मैत्रेयीने दिलेल्या तक्रारीवरून कार्तिकविरोधात बलात्कार, विश्वासघात आणि फसवणूक केल्याने गुन्हा दाखल केला आहे. कार्तिकचा एका अन्य मुलीसोबत साखरपुडा झाल्यानंतर पीडित मैत्रेयीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
'कार्तिकचे माझ्यासोबत लग्न झाले असून
आपण त्याच्या बाळाची आई होणार आहे:' असा दावाही मैत्रेयीने सगळ्या पाहुण्यासमोर केला होता. कार्तिक आपला नवरा असून तो दुसरे लग्न कसे काय करू शकतो? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
दरम्यान, आपल्याला कुटुंबियांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. कार्तिक गौडाने देखील मैत्रेयीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहे.
(फाइल फोटोः आरोपी कार्तिक गौडा आणि पीडित कन्नड अभिनेत्री मैत्रेयी)