आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापू म्हणतात, ‘कोठडीत डांबू नका.. मी अशुद्ध होईन..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले संत आसारामबापू यांना जोधपूरच्या जिल्हा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. इंदूरहून जोधपूरला आणल्यानंतर आरएसी बटालियन कॅम्पमध्ये त्यांची रविवारी कसून चौकशी करण्यात आली. त्यांना पोलिस ठाण्यातील कोठडीत हलवण्याचा विचार सुरू झाला तेव्हा बापू म्हणाले, ‘कोठडीत डांबू नका.. मी अशुद्ध होईन..’

गेल्या 15 ऑगस्ट रोजी पीडित मुलीसोबत फार्महाऊसवर होतो, असे 72 वर्षीय बापूंनी कबूल केले. मात्र, वयाने नातीसारख्या असलेल्या मुलीसोबत एकांतात राहणे गुन्हा आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘मला एकांतवास आवडतो. आता तुरुंगातही तो मिळेल. साधना कुठेही होऊ शकते,’ असेही ते म्हणाले.

सायंकाळी 5 वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ज्या फार्महाऊसवर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा बापूंवर आरोप आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले. अटकेनंतर दोन वेळा बापूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते चौकशीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. इंदूरला अटक केल्यानंतर तेथील विमानतळावर पोहोचताच डॉक्टरांचे पथक हजर होते. त्यांनी तपासणी केल्यानंतर रविवारी सकाळी बापूंना विमानाने जोधपूरला हलवण्यात आले. बटालियन कॅम्पमध्ये आल्यावर लगेच त्यांची तपासणी करण्यात आली.
कोणी लहान-मोठा नसतो. कायदा सर्वांसाठी समान आहे. शनिवारीच मी विदिशात ही भूमिका मांडली होती.
सुषमा स्वराज

महिलांवरील अत्याचारांविरुद्ध भाजपमध्ये सुषमा स्वराज कायम आवाज उठवतात. आज त्या का गप्प आहेत. : दिग्विजयसिंह
ट्विटरवर वाक्युद्ध संबंधित.


असे झाले सवाल-जवाब
पीडितेला ओळखता का?
आसाराम : होय, तिने दीक्षा घेतलेली आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांनीही अशीच दीक्षा घेतली आहे.
पीडितेला जोधपूरला बोलावले होते?
आसाराम : नाही. ते स्वत:च जोधपूरला आले होते.


काही कामानिमित्त आले होते की..
आसाराम : दर्शनासाठी आणि प्रवचनासाठी ते आले होते.


आश्रमाऐवजी त्यांना फार्महाऊसमध्ये का ठेवले?
आसाराम : खूप लांबून आले होते म्हणून फार्महाऊसवर बोलावले. तेव्हा कुणालाही आक्षेप नव्हता.


15 ऑगस्टला रात्री नेमके काय झाले?
आसाराम : नित्यनेमाप्रमाणे मी ध्यानाला गेलो. हे लोकही बाहेर मंत्रोच्चारात मग्न होते.


पीडितेच्या आरोपाबद्दल म्हणणे काय?
आसाराम : मी तर साधनेत होतो. मुलीचे आरोप निराधार आणि धादांत खोटे आहेत.


विमानात बापूंसोबत ‘भास्कर’ रिपोर्टर
कारस्थानी लोकांना देव पाहून घेईल..
विमानातून प्रशांत कालीधार
विमानात बापूंनी फक्त ‘दैनिक भास्कर’शीच संवाद साधला. उर्वरित प्रतिनिधींना ‘सर्वांचे, देशाचे कल्याण होवो’, एवढेच सांगत राहिले. विमान दिल्लीत उतरताना ‘दै. भास्कर’ने विचारले, ‘दिल्लीकरांना आपण काय सांगाल? कारण येथील मॅडम आणि त्यांच्या पुत्राच्या सांगण्यावरूनच हे घडत आहे असे आपण म्हणाला होतात..’ यावर बापूंनी डोळे विस्फारले. ते म्हणाले, ‘सबंध देश आणि देव हे सारे पाहत आहे. जे लोक हे सारे घडवून आणत आहेत त्यांना देव बघून घेईल. देशात 98 टक्के लोकांवर असे खोटे आरोप होतात. इंदूरच्या एसपींनी मला हे सांगितले.’ थोडे थांबून लगेच म्हणाले, माझ्या वाईटावर कोण आहेत हे माहीत नाही.

धर्मांतर हेच कारण : बापू म्हणाले, मी धर्मांतरविरोधी आहे. यामुळेच असले प्रकार होतात. तत्पूर्वी इंदूरमध्ये एअर इंडियाच्या विमानात पोलिसांनी त्यांना कोपर्‍यात शेवटच्या सीटवर (27 एफ) बसवले. दोन अधिकारी शेजारी होते.

एअर होस्टेस म्हणाली, या लोकांना आकाशातून खाली उतरवू का? : बापूंचे काही सर्मथकही विमानात होते. त्यांचा माध्यमांच्या प्रतिनिधींवर रोष होता. एअर होस्टेस म्हणाली, ‘या लोकांना काय आकाशातून खाली उतरवू का? ’ इंदूर ते दिल्ली आणि नंतर दिल्ली ते जोधपूर या प्रवासात बापू अस्वस्थ होते. हातात चंदनाची माळ घेऊन ते काहीतरी पुटपुटत होते. एकाने विचारले तेव्हा म्हणाले, ‘रामनाम जपाची माळ आहे.’ यादरम्यान कधी ते डोळे मिटायचे. कधी हळूच खिडकीबाहेर पाहत पंचाने चेहरा पुसायचे. काही हौशी प्रवासी बापूंची मोबाइलमध्ये क्लिपिंग घेण्यासाठी मागे येऊन शुटिंग घेत होते. त्यांनाही बापूंनी हात जोडले.