आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Son Narayan Sai Allegly Marry A Women To His Friend And Misbehave

आता आसाराम बापूच्या मुलाविरोधात शिष्याच्या पत्नीने केली छेडछाडीची तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसाराम बापूचे चिरंजीव नारायण साई देखील त्यांच्याच मार्गावर निघाले आहेत. एका महिलेने त्यांच्याविरोधात इंदूरच्या एका न्यायालयात खटला दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे, की नारायण साई यांनी नऊ वर्षांपूर्वी तिची फसवणूक करून ईश्वर वाधवाणी याच्याशी तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर तिचा विनयभंग केला.

ही महिला आता घटस्फोटीत असून तिने वकील एम. ए. शेख यांच्या सल्ल्यानुसार ईश्वर वाधवाणीसह गिनी वाधवाणी, दीपक वाधवाणी, बालकिशन उर्फ शेरू आणि पुष्पा यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. ज्या व्यक्तिसोबत महिलेचा विवाह करुन देण्यात आला, त्याच्या भूखंडावर नारायण साईंचा सत्संग सुरु होता.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिला सांगितले गेले होते, की ईश्वर घटस्फोटीत आहे. लग्नाच्या दोनच महिन्यात त्याचे गुपित उघड झाले. ईश्वरचे लग्न झालेले होते आणि त्याची पत्नीही त्याच्यासोबतच राहात होती. दरम्यानच्या काळात महिला गर्भवती राहिली. ईश्वर तिच्यावर गर्भपात करण्याची बळजबरी करीत होता. त्याची तक्रार करण्यासाठी महिला नारायण साईकडे गेली. तेव्हा त्याने मदत करण्याऐवजी महिलेसोबत अश्लिल चाळे सुरु केले. 2004 ची ही घटना आहे. या महिलेला आता एक मुलगा देखील आहे.

त्यानंतर महिलेने ईश्वर विरुद्ध हुंडाबळी आणि मारहाणीची तक्रार दाखल केली. या तक्रारीत नारायण साईवरही आरोप करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआरमधून साईचे नाव वगळले. आता आसारामविरुद्धची प्रकरणे समोर येऊ लागल्यामुळे महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध पुन्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी या महिलेने इंदूरचे पोलिस अधिक्षक अनिल कुशवाह यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. त्यानंतर कुशवाह यांनी तिची तक्रार सरकारी वकीलांकडे तपासासाठी दिली आहे.