आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram's Doctor Nita Completed Her Ayurvedic Education In Pune

आसारामांची वैद्य नीताचे आयुर्वेद शिक्षण पुण्यात, सध्‍या जोधपूरातच मुक्काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसारामबापूंनी ज्या वैद्य नीताला कारागृहात पाठवण्याची विनंती केली ती त्यांना अटक झाल्याच्या दिवसापासून जोधपुरातच आहे. हॉटेल ताजहरीमध्ये 18 दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नीताचे शिक्षण पुण्यातील टिळक आयुर्वेदिक कॉलेजात झालेले आहे. एवढेच नाही, तर बापूंच्या प्रत्येक सुनावणीला नीता न्यायालयात हजर राहतात. अखेर आसाराम यांचे नेमके दुखणे तरी काय आहे, याबाबत नीताशी दै. ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने खास बातचीत केली.


० कधीपासून बापूंच्या वैद्य आहात?
बापूंकडून 1998 मध्ये दीक्षा घेतली. तेव्हापासून त्यांच्यासोबतच आहे. पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक कॉलेजात माझे शिक्षण झाले. 1991 मध्ये मी आयुर्वेदाचार्य ही पदवी घेतली.
० बापूंचा आजार काय व कधीपासून?
बापूंना ट्रायजेमिनल न्युरेल्जिया नामक अ‍ॅलोपॅथिक आजार आहे. 13 वर्षांपासून त्यांना हा त्रास आहे. बापू यालाच त्रिनाडी शूल म्हणतात.
० आपण आजारावर उपचार करता का?
गुजरातमधील राजवैद्य धनशंकर गौरी शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत आहे. त्यावर नस्म, शिरोधारा आणि कर्णपूरण उपचार केला जातो. याशिवाय काही औषधीही दिली जात आहेत.
० रोज उपचाराची गरज असते काय?
वेदना वाढल्यास केला जातो. शिरोधारा व इतर उपचार करण्यात येतो.
० हा आजार का होतो?
जास्त फिरणे, बोलणे, परिश्रम करणे, कमी झोपणे यामुळे हा त्रास संभवतो. प्रसूती वेदनेपेक्षाही भयंकर वेदना होतात.
० तुम्हाला कारागृहात रोज दोन तास बोलवण्याचा बापूंचा आग्रह का?
वेदना जास्त झाल्या की, शिरोधारा उपचार आठ दिवस केला जातो. त्यासाठी दीड तास लागतो. तयारी व येण्याजाण्याचा वेळ धरून दोन तास लागतात.
० वैद्यकीय तपासणीत बापूंना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट झाले आहे?
एमआरआयमध्ये याचे निदान होत नाही.
० पंचेड बुटी औषध काय आहे, त्यात अफू असते का?
आयुर्वेदात पंचेड बुटी नामक कोणतीही औषधी नाही. ऐकण्यातही नाही. आमच्या आश्रमात कोणीही ती बनवत नाही.
० आयुर्वेदात तर त्रिनाडी शूल अशा नावाचा कोणताही आजार नाही?
या आजाराला आयुर्वेदात अनंतवात म्हणतात. बोलीभाषेत त्रिनाडी शूल. आयुर्वेदानुसार आजाराचे योग्य नाव सांगायला बापू काही वैद्य नाहीत.