आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram's Former House Maid Arrested In The Case Of Murder

आसाराम यांना हत्या प्रकरणात अडकवणारा माजी सेवक अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - आसाराम बापू यांच्या येथील आश्रमाची देखभाल करणा-या माजी सेवकास अटक करण्यात आली. जम्मू आश्रमातील तीन मुलांच्या मृत्यू प्रकरणात आसाराम यांना अडकवण्याचा त्याने प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
आरोपी भोला नाथला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अतुलकुमार गोयल यांनी सांगितले. जयपूरचा रहिवासी नाथविरुद्ध 17 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील भगवती नगरमधील आश्रमात तीन मुलांची हत्या करून त्यांना दफन करण्यात आल्याचे सांगत नाथने या प्रकरणाशी आसाराम यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भोला नाथने गेल्या महिन्यात टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलांच्या मृत्यूचा उल्लेख केला होता. याच आधारावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. राज कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मुलांच्या मृत्यू प्रकरणाशी आसाराम यांचा संबंध असल्याचा आरोप केला. यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे व चौकशीचे आदेश दिले.
आश्रमात सांगाडे आणून पुरले
यादरम्यान, पोलिसांनी विक्रांत शर्मा या तरुणाची चौकशी केली. त्यात भोलाने रचलेल्या कटाचा पर्दाफाश केला. विक्रांतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलांची आश्रमात हत्या करून दफन केल्याचे सांगण्यासाठी भोलाने आपल्याला तीन मानवी सांगाडे आणून पुरण्यास सांगितले होते. विक्रांतला न्यायालयात उभे करण्यात आले तसेच भोला नाथ व त्याच्यातील दूरध्वनी संभाषणाची सीडीही जमा करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर भोला नाथविरुद्ध फौजदारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 72 वर्षीय आसाराम यांना लैंगिक शोषण प्रकरणात ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली आहे.