आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असोचेमचा सर्व्हे: बाळासाठी अाई घेते स्वेच्छेने निवृत्ती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - रांधा, वाढा, उष्टी काढा या समीकरणातून आता महिलांची सुटका झाली असल्याचे ढोल पिटवले जात असले तरी बाळाच्या संगोपनासाठी अनेक महिलांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे. असोचेमने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.देशातील १० प्रमुख शहरांत २५ ते ३० वयोगटातील नोकरी करणाऱ्या व प्रथमच माता झालेल्या महिलांचा यात समावेश होता. मुलाच्या संगोपनासाठी करिअरवर पाणी सोडावे लागल्याचे ३० टक्के महिलांनी सांगितले. असोचेमच्या सर्वेक्षणानुसार, देशातील शहरांत उच्चशिक्षित महिलांना मुलांच्या पालनपोषणासाठी नोकरी सोडावी लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुलांकडे लक्ष देणे आणि त्याच वेळी करिअर सांभाळणे हे या महिलांसाठी तारेवरची कसरत ठरत अाहे. असोचेम या उद्योग क्षेत्रातील संघटनेच्या सामाजिक विकास संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. यंदाच्या मार्च -एप्रिल महिन्यांत देशातील दहा प्रमुख शहरातील २५ ते ३० वयोगटातील पहिलटकरणींचा यात समावेश होता.

त्रिकाेणी कुटुंबात तारेवरची कसरत
त्रिकाेणी कुटुंबातील महिलांसाठी बाळाचे संगोपन आणि त्याच वेळी नोकरी सांभाळणे हे अत्यंत कठीण काम असल्याचे निरीक्षण असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी नोंदवले. सर्वेक्षणात सहभागी त्रिकाेणी कुटुंबातील प्रथम मातांना मूल आणि नोकरी हे संतुलन राखताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते, असे रावत यांनी स्पष्ट केले.

१० शहरांतील ४०० प्रथम मातांचा सर्व्हे
*कोणाचा सहभाग : ४०० प्रथम माता
*कधी झाला : मार्च-एप्रिल २०१५
*कोठे झाला : अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, लखनऊ, कोलकाता , बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, मुंबई

मातृत्वानंतर पुन्हा नोकरी
सर्वेक्षणात सहभागी ४०० प्रथम मातांपैकी बहुतेक जणी उच्चविद्याविभूषित व मास्टर पदवीधारक आहेत. यापैकी अनेक जणींनी काही वर्षांच्या मातापणानंतर नोकरी करणार असल्याचे मत नोंदवले. मात्र सापत्न वागणूक मिळण्याची शक्यता असल्याने पूर्वीच्या जागी नोकरी करणार नसल्याचे सांगितले.