गुवाहाटी - आसाममध्ये हिंसाचाराचा फटका बसलेल्या बकसा, कोकराझार आणि चिराग जिल्ह्यातील संचारबंदी सोमवारी शिथिल करण्यात आली. गुरुवारी बोडो दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात येथे सुमारे 34 जणांचा बळी गेला आहे.
हिंसाचाराच्या कोणत्याही ताज्या घटनांची नोंद नसल्याने जिल्हा प्रशासनाने
बसका जिल्ह्यातील संचारबंदी आठ तासांसाठी, कोकराझार येथे सहा तासांसाठी तर चिराग येथे सात तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सकाळी १० वाजेपासून संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी लष्कराने परिसरात फ्लॅगमार्च सुरू ठेवला आहे. तसेच नव्याने घटना घडू नयेत यासाठी हिंसाचाराचा फटका बसलेल्या परिसरांमध्ये जवान लक्ष ठेऊन आहेत. पेट्रोलिंग सुरु आहे. शुक्रवारनंतर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या नव्या घटनांची नोंद नाही.
दरम्यान रविवारी बस्कल गावामध्ये दोन दहशतवाद्यांचे एन्काऊंटर करण्यात आले. त्यामुळे हल्ला टाळण्यात यश आल्याचे पोलिस महानिरिक्षक एल.आर.बिश्नोई यांनी सांगितले. उदलगुडी जिल्ह्यातील या गावासह जवळपासच्या गावात हिंसाचार घडवण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता, असेही ते म्हणाले.