आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: मोदींचे सरकार आल्यानंतर असहिष्णुतेत वाढ: सोनिया गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बक्सर- नरेंद्र मोदी सरकार आपली विचारसरणी लोकांवर लादू पाहत आहे, असा आरोप करतानाच नवीन सरकार आल्यानंतर समाजातील असहिष्णुतेमध्ये वाढ झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. समाजात असहिष्णुता वाढल्याने निष्पाप व्यक्तींची हत्या होत आहे. त्याचा परिणाम लोकशाही आणि समाजाच्या एकसंधतेवर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोनिया शनिवारी एका जाहीर सभेत बोलत होत्या. मोदी वारंवार काँग्रेसच्या सहा दशकांच्या कारकीर्दीवर टीका करतात. परंतु काँग्रेसनेच या काळात लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले आहे. त्याच व्यवस्थेने मोदींना पंतप्रधान बनवले आहे. वास्तविक भाजपशासित सरकार लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. त्यातूनच सांप्रदायिक तणाव वाढू लागला आहे. केवळ अफवेतून निष्पाप लोकांची हत्या होऊ लागली आहे. बुद्धिवाद्यांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्यांना आपले विचार व्यक्त करण्यास मनाई करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे समाजातील सौहार्दाला धक्का बसू शकतो. ही वाईट गोष्ट तर आहेच. किंबहुना ती लाजिरवाणी बाब म्हटली पाहिजे, असे साेनियांनी सांगून दादरी घटनेसंदर्भात सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दरम्यान, राज्यात विधानसभेसाठी पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. या टप्प्यात ५० जागा आहेत.

जीएसटीमुळे सामान्यांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याने विरोध
जीएसटी विधेयकाला काँग्रेसने विरोध केला आहे. केवळ विरोधासाठी विरोध नाही. त्यामागे लोकहिताचा भावना आहे. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर बाजारातील उत्पादनांचे भाव वाढतील. पर्यायाने त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर पडेल, असे सोनियांनी स्पष्ट केले.

मोदीजी महिला-शेतकऱ्यांचा आवाज ऐकतील का?
डाळी, भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली आहे. मग गृहिणींना घर चालवणे किती कठीण जाईल, याचा विचार कोणी केलाय का? मोदीजी महिलांचा आवाज ऐकतील का ? मोदीजी शेतकऱ्यांचा आवाज ऐकतील ? उत्तर नाही असेच आहे. रोजगाराची आशाही सोडून द्या. कारण गुजरातमध्ये ५० हजार कामगारांना हिरे कारखान्यातून नोकरी गमवावी लागली आहे. बिहारमध्ये तर ही मोठी समस्या आहे. मग ते तरुणांचा तरी आवाज ऐकतील का ? असे सवाल काँग्रेस अध्यक्षांनी केले.

आश्वासनपूर्तीचा विसर
मोदींनी जनतेला त्यातही शेतकरी, महिला आणि तरुणांना काही आश्वासने दिली होती. ती पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे. तरुणांना मला ही गोष्ट सांगायची आहे. ब्रिटिशांचे साम्राज्य असताना देशात काहीही राहिले नव्हते. परंतु गेल्या सहा दशकांत काँग्रेसने शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, आण्विक क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल घडवून दाखवले. देशाच्या महान परंपरेला पुढे नेण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले, असा दावा सोनियांनी केला.
बातम्या आणखी आहेत...