आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनारस विद्यापीठात सामूहिक बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा अमेरिकन तरूणीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) आवारात भारतीय वंशाच्या अमेरिकन रहिवासी आयुर्वेदिक डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. बासवती भट्टाचार्य यांचा आरोप आहे, की विद्यापीठाच्या आवारात पाच लोकांनी त्यांच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. डॉ. बासवती बीएचयू मध्ये पी.एचडी करत आहेत. त्या मधुमेहावर संशोधन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की पोलिसांनी प्रथम त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल दिल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवण्यात आली.
काय आहे घटना
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, डॉ. बासवती 22 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या एका मित्रासोबत विद्यापीठाच्या परिसरात फिरत होत्या. तेव्हा पाच लोक तिथे आले आणि त्यांनी डॉ. बासवती यांची छेड काढली. त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले असल्याने बासवती यांनी त्यांचा मुकाबला केला. यात त्या जखमी झाल्या. पण त्यांनी गुडांना पिटाळून लावले. त्यांच्या प्रतिकारामुळे पुढील अनर्थ घडला नाही. गुंड त्यांचा मोबाइल फोन घेऊन पसार झाले. डॉ. बासवती यांचे म्हणणे आहे, की जर हा लुटालुटीचा प्रकार असता तर त्यावेळी माझ्याकडे लॅपटॉप देखील होता. गुंडांनी तो नेला नाही. याचा अर्थ त्यांचा उद्देश बलात्काराचाच होता.
वैद्यकीय तपासणीवेळी डॉक्टर म्हणाले भविष्य सांगा
डॉ. बासवती यांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, मी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले तेव्हा कोणीच माझे ऐकायला तयार नव्हते. उलट मलाच तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानतंर मी माझ्या मित्रांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनी या प्रकरणात दखल दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. माझी वैद्यकीय तपासणी एक महिला पोलिस अधिकारी आणि दोन पुरुष डॉक्टरांनी केली. त्यावेळी मला प्रचंड यातना झाल्या. तपासणी करत असलेल्या डॉक्टरांना जेव्हा कळाले मी ब्राम्हण आणि आयुर्वेदाची तज्ज्ञ आहे तेव्हा त्यांनी स्वतःचा हात माझ्या हातात दिला आणि आमचे भविष्य सांगा अशी बळजबरी केली.
घटनास्थळी घेऊन गेले पोलिस
डॉक्टर बासवती यांच्या म्हणण्यानुसार, 'प्रकरणाचा तपास करत असलेले सहायक पोलिस निरिक्षक घटनास्थळी घेऊन गेले. तिथे नेल्यानतंर त्यांनी संपूर्ण घटना पुन्हा कथन करण्यास सांगितली. एका महिला पोलिस अधिकाऱ्याने तर तक्रार दाखल करण्याचे कारण काय असा प्रश्न विचारला.'
मोदींवर जोरदार निशाणा
इंग्रजी दैनिकानूसार डॉक्टरने सांगितले, 'मोदींच्या राज्यात हे सर्व होत आहे. ते पंतप्रधान झाल्यापासून गेल्या एक वर्षात काहीही बदलले नाही. जसे पूर्वी होत होते तसेच आताही सुरू आहे. माझ्या मित्रांनी पोलिस अधिक्षकांची भेट घडवून आणली नसती, तर माझी तक्रार घ्यायला कोणी तयार नव्हते.' वाराणसी हा मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. डॉक्टर म्हणाल्या, 'मोदींनी प्रथम आपल्या घरात दिवे लावले पाहिजे नंतर परदेशावर फोकस केला पाहिजे. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, की ते केवळ कॉर्पोरेट आणि श्रीमंताचे प्रतिनिधी नाहीत. मोदींनी परदेश वाऱ्या करुन गंगाजळी जमा करण्यापेक्षा आपल्या देशावर लक्ष दिले पाहिजे. परदेशी गंगाजळीपेक्षा आम्ही भारतीय जास्त महत्त्वाचे आहोत.'
पोलिस काय म्हणतात
पीडित डॉक्टरचा आरोप आहे, की पोलिसांनी लवकर गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्याउलट पोलिसांचे म्हणणे आहे, की महिला तक्रार द्यायला तयार नव्हती. पोलिस अधिक्षकांनी तिला तक्रार देण्यास सांगितले. तिला कोणताही त्रास होणार नाही असा विश्वास दिला, त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. आम्ही त्यांचा फोन सर्व्हिलान्स वर टाकला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.