आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी विध्वंस: अडवाणी, जोशी, भारतींविरुद्ध गुन्हेगारी कटाचे अाराेप निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर होताना ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी. - Divya Marathi
लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर होताना ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी.
लखनऊ - अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात २५ वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि अन्य तिघांविरुद्ध मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले. या सर्वांविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 
 
विनय कटियार, विष्णुहरी दालमिया व साध्वी ऋतुंभरा हेही आरोपी आहेत.या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १५३, १५३ अ, २९५, ५०५ व १२० ब अन्वये आरोप निश्चित केले.  गुन्हेगारी कट रचणे, राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावण्याची ही कलमे आहेत. वादग्रस्त वास्तू पाडण्यात आपला हात नसल्याचे सांगून आरोप निराधार असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे. दुसऱ्या प्रकरणात रामविलास  वेदांती, वैकुंठलाल शर्मा, चंपतराय बन्सल, महंत नृत्यगोपाल दास, धरम दास व सतीश प्रधान यांच्यावर कटाचे आरोप निश्चित केलेलेे आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आदेश
अडवाणींसह इतर आरोपींविरुद्ध वादग्रस्त वास्तू पाडण्याच्या प्रकरणात सीबीआयने ठेवलेले कटाचे आरोप २००१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावले होते. सन २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात कलम १२० ब नुसार खटला चालवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची नियमित सुनावणी घेऊन खटला दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
न्यायाधीशांची बदली नको
ही सुनावणी सुरू असताना संबंधित न्यायाधीशांची बदली केली जाऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणाची सुनावणी रोज होईल. राजस्थानचे राज्यपाल आणि या प्रकरणातील एक आरोपी कल्याणसिंह सध्या घटनात्मक पदावर असल्याने त्यांना या खटल्यातून न्यायालयाने सूट दिली आहे.
 
विश्व हिंदू परिषदेची १ जून राेजी बैठक
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक १ जून रोजी हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आली असून दोन दिवस ही बैठक चालेल. या बैठकीत रामजन्मभूमी आणि मंदिर उभारणीसह दहशतवादासारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. बैठकीत देशातील दोनशेहून अधिक संत व धर्मोपदेशक सहभागी होतील.
 
अडवाणी-जोशींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली भेट
अडवाणी व जोशींसह इतर आरोपी मंगळवारी दिल्लीहून लखनऊत दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सर्वांची भेट घेतली. या वेळी साध्वी ऋतुंभरा, उमा भारती, विनय कटियार व विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णुहरी दालमिया उपस्थित होते. दरम्यान, हे सर्व नेते बाबरी प्रकरणात निर्दोष असल्याचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे बाबरी प्रकरण... 
बातम्या आणखी आहेत...