कोलकाता- मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक असलेल्या बाबुल यांनी काही दिवसांपूर्वी साखरपुडा उरकला आहे. त्यांची वाग्दत्त वधू हवाई सुंदरी आहे. एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बाबुल यांनी आपली प्रेमकथा सांगितली. त्यांचे पहिले लग्न रियासोबत १९९५ मध्ये झाले. २००६ मध्ये काडीमोड झाला.
रिया व बाबुल यांची पहिली भेट शाहरुख खानच्या एका कार्यक्रमात टोरांटोत झाली. दोघांना शर्मिली ही मुलगीही आहे. बाबुल यांची प्रेमकथा त्यांच्याच शब्दांत...
गेल्या २ वर्षांपासून माझे नशीब जणू हवेतच फिरत होते. माझ्यासोबत ३०-३५ हजार फुटांवर अजब गोष्टी होतात. असं वाटतं की कुणी अस्मानात बसून माझ्या आयुष्याची पटकथा लिहीत आहे. असे दोन वेळा घडलेय. मला लोकसभेचे तिकीटही विमानातच मिळाले हाेते. बाबा रामदेव शेजारी हाेते. बोलता-बोलता त्यांनी राजकारणात येण्याचे आमंत्रण व भाजपकडून तिकिटाचे आश्वासनही दिले.
प्रवासादरम्यान हा संवाद होत असताना तेथील एक हवाई सुंदरी अचानक म्हणाली, यांना तिकीट मिळाले तर ते विजयी होतीलच. दहाएक दिवसानंतर मी विमानाने कोलकात्याला जात होतो. दरम्यान, मला पुन्हा ती हवाई सुंदरी भेटली. मात्र, यावेळी माझी भूमिका वेगळी होती. मला ती काहीशी स्पेशल वाटली. बहुधा, हेच पहिल्या नजरेतलं प्रेम असावं. मी तिला तिचे नाव व फोन नंबर विचारला.
रचना शर्मा, तिच्यातला साधेपणा मला भावला. माझ्या अडचणीतील आयुष्याचा हाच एक्स फॅक्टर राहिलेला आहे. यानंतर ती तिला अनेक पद्धतीने प्रपोज केले. पण खेळ काही जमला नाही. यानंतर मी तिला ४० दिवसांपर्यंत रोज एक गाणे लिहून पाठवले, तेव्हा कुठे तिच्या मनाची कळी उमलली. यानंतर दोन वर्षे आमचे प्रेम खुलले. शेवटी आम्ही विवाहाचा निर्णय घेतला. साखरपुडा झालाय, ९ ऑगस्टला लग्न आहे. नंतरचाही प्लान रेडी आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस कोलकाता, तर पाचवा मुंबईत साजरा करू. फक्त चाहत्यांचा आशीर्वाद हवा...
सुप्रियो यांचा घटस्फोट झालेला आहे..- राजकारणात येण्यापूर्वी गायक असलेल्या बाबुल सुप्रियो यांचे लग्न झाले होते.
- रियासोबत त्यांनी 1995 मध्ये लग्न केले होते. 2006 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
- दोघांची भेट शाहरुख खानच्या एका कार्यक्रमात टोरंटो येथे झाली होती.
- दोघांना शर्मीली नावाची एक मुलगीही आहे. तिचा जन्म 2002 झाला होता.