फरीदाबाद - हरियाणाच्या बल्लभगडला लागून असलेल्या अटाली गावात झालेल्या दंगल प्रकरणी जाट आणि मुस्लीम समुदायामधील वाद मिटण्याची शक्यता आहे. दोन्ही समुदायांमध्ये मंगळवारी चर्चा झाली. त्यावळी जाट समुदायाच्या लोकांनी मुस्लीमांना गावी परतण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त जागेवर मशीद बनवू देण्याचे आश्वासनही दिले. दंगलीनंतर सुमारे 150 मुस्लीम कुटुंबे बल्लभगड पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसली होती.
जिल्हा प्रशासनाचे कारवाईचे आदेश
जिल्हा प्रशासनाने याबाबत आश्वासन दिले की, FIR मध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. दरम्यान मुस्लीम समुदायाने गावी परतल्यानंतर याबाबत निर्णय करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गावातील वरिष्ठांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या FIR नुसार शस्त्र घेऊन आलेल्या सुमारे 2 हजार लोकांनी हल्ला करून मशीदीचे बांधकाम पाडले, तसेच लोकांना मारहाणही केली.
बल्लभगड ठाण्याच्या जवळ असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. त्यात सहभागी झालेल्या नाजिम अली यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, जाट समुदायाने आम्हाला मशीद बनवू देऊ, पण लगेच नाही असे सांगितले. त्याशिवाय त्यांनी काही अटीही ठेवल्या. या प्रकरणात काही जणांना अटकही केली जाणार आहे पण तेही लगेच नाही. आता मशीदीचे काम महिन्याच्या अखेरीस रमाजानपूर्वी सुरू केले जाईल असे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनानेही एफआयआरमध्ये नावे असलेल्यांना अटक करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे जाट समुदायाचे ओम चौधरी म्हणाले की, आम्हाला शांती हवी आहे. फरीदाबामध्ये अनेक वर्षांपासून हिंदु-मुस्लीम सलोख्याने राहत आहेत. त्यामुळे सर्व जेवढ्या लवकर निवळेल तेवढे चांगले आहे.
जमिनीवरून वाद
जाट आणि मुस्लीम समुदायामधील वादाचे मुख्य कारण ही जमीन आहे. ज्या जमिनीवर ही मशीद तयार होत आहे ती, वक्फ बोर्डाची असल्याचे मुस्लीम समुदायाचे म्हणणे आहे. तर जाट समुदायाच्या मते ती जमीन ग्राम पंचायतीची आहे. दरम्यान, पोलिसांनी अटाली गावात मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.