आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दंगेखोरात महिलाही, कोर्टाने दिला होता मशिदीची जागा मुस्लिमांची असल्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद - हरियाणाच्या बल्लभगड गावा जवळील अटाली येथे सोमवारी ज्या मशिदीच्या जमीनीवरुन धार्मिक हिंसाचार भडकला होता, त्या जमीनीसंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच फरीदाबादच्या एका कोर्टाने जमीन मुस्लिमांची संपत्ती असल्याचा निर्णय दिला होता. कोर्टाने म्हटले होते, की हिंदू याचिकाकर्त्यांना मशिदीची जमीन ग्रामपंचायतीच्या मालकिची असल्याचे सिद्ध करता आलेले नाही. दुसरीकडे, सोमवारी भडकलेल्या हिंसाचारात जाट समुदायाच्या अनेक महिलांनीही मुस्लिमांवर हल्ले केले आणि त्या देखील दंगलीत सहभागी होत्या, असा अहवाल समोर आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की येथील समाज हा पराकोटीचा रुढीवादी आहे, त्यामुळे महिला आरोपींना अटक करणे मोठी डोकेदुखी झाली आहे.
अटाली येथे 26 मे रोजी दोन हजार शस्त्रसज्ज लोकांच्या जमावाने मुस्लिमांच्या घर आणि दुकानांवर हल्ला केला होता. मुस्लिमांची अनेक घरे आणि दुकाने आगीच्या भक्षस्थानी दिली होती. यात 15 लोक जखमी झाले होते. येथून 150 मुस्लिम कुटुंबांनी भीतीमुळे पलायन केले, तर काही पोलिसांच्या आश्रयाला गेले होते.
हल्लेखोरांत शेकडो महिला
गावातील मुस्लिमांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला होत्या. त्यांनी मुस्लिम महिलांना लक्ष्य केले होते. एका 70 वर्षीय वृद्धाने सांगितले, की त्या आमच्या घरात घुसल्या आणि महिलांना शिव्या देऊ लागल्या. त्यांचे केस धरून त्यांना मारहाण करत होत्या आणि गाव सोडून निघून जा, असे ओरडत होत्या. हरियाणा पोलिसांनी 20 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय प्रताप म्हणाले, 'दोषींना जेरबंद करण्यासाठी कायदेशी मार्गांचा अवलंब केला जाईल.'
काय म्हणाले होते कोर्ट
मशिदीच्या जागेच्या वादातून जाट समुदायाने कोर्टात दावा केला होता, की ती जागा ग्राम पंचायतीच्या मालकीची आहे. मुस्लिांना ती जमीन कब्रस्थानासाठी दिली गेली होती, मशिद बांधण्यासाठी नाही. तर मुस्लिमांचे म्हणणे आहे, की जमीन वक्फ बोर्डाची आहे. 31 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश विनय शर्मा यांनी या प्रकरणाचा अभ्यास करुन निर्णय दिला होता. त्यांच्या निकालात म्हटले होते, 'वादग्रस्त जमीन ही कायम मुस्लिमांच्याच ताब्यात होती. याचिकाकर्त्यांनी जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यासाठी आवश्यक पुरावे सादर करण्यासाठी ते अपयशी ठरले.'
पुढे काय
या निर्णयानंतर अटाली गावातील पंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि त्यांनी मशिदीच्या बांधकामावर स्थगिती मिळवली. मेच्या प्रारंभी चंदीगड जिल्हा महसुल अधिकाऱ्यांचे एक पथक तपासासाठी बल्लभगडला पोहोचले आणि त्यांनी एक अहवाल तयार केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिामांना काम सुरु ठेवण्यास परवानगी दिली. एक आठवड्यापूर्वी या कामाला सुरुवात झाली आणि गावात हिंसाचार भडकला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बल्लभगडच्या हिंसाचारासंबंधीची छायाचित्रे