आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beni Prasad Varma Says SP No Where In Next Election

काँग्रेस टॉप, भाजप हाफ, सपा साफ; बेनीप्रसाद वर्मा यांची पुन्‍हा बोलबच्‍चनगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहाराईच - केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी पुन्हा एकदा समाजवादी पक्षावर तोंडसुख घेतले आहे. भारतीय पोलाद प्राधिकरण शाखेचे भूमिपूजन करण्यासाठी येथे आलेल्या वर्मा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस टॉप, भाजप हाफ तर सपा साफ होईल, असे भाकीत वर्तवले. एवढेच नव्हे तर आगामी निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी खासदार डिम्पल यादव हे तिघेही पराभूत होतील. समाजवादी पक्ष केवळ दोन जागांवर गुंडाळला जाईल, असा दावा त्यांनी केला. बेनीप्रसाद यांच्या स्फोटक विधानामुळे सपा आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वर्मांच्या या विधानानंतर कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन गोंधळ घालत असल्याने काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी संतप्त होऊन घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांची धक्काबुक्की सुरू झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी परस्परांवर खुच्र्या फेकल्याने अनेक जण जखमी झाले. संतप्त सपा कार्यकर्त्यांना नंतर पोलिसांनी उचलबांगडी करून बाहेर नेले.

मुलायमना हरवण्यासाठी बसपाचीही मदत घेऊ

बेनीप्रसाद वर्मा एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंहांना त्यांच्या मैनपुरी मतदारसंघात हरवण्यासाठी गरज पडल्यास बहुजन समाज पक्षासोबत हातमिळवणी करण्यासही आपण मागेपुढे बघणार नाही. आगामी निवडणुकीत मुलायम यांना त्यांची लोकसभेची जागा टिकवणेदेखील कठीण होईल. त्यांना हरवण्यासाठी आपण मायावतींशीही मैत्री करू. सपाने जातिधर्माच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या विकासावर त्यांच्या सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर पडत आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचा पर्दाफाश होईल. निवडणुकीत काँग्रेसला 50 जागा मिळतील.

‘बेनी’वाणी
समाजवादी पक्षाला दोन जागा मिळतील.
बाबरी मशीद पाडणे हा मुलायम, अडवाणींचा कट.
अखिलेश, डिम्पल, मुलायम, यादव यांचाही पराभव होणार.
गेल्या 20 वर्षांत काँग्रेसला विरोधी पक्षांनी नव्हे, काँग्रेसनेच हरवले.

भाजप-सपा संधिसाधू
वर्मा यांनी भाजप - सपा हे दोघेही सारखेच संधिसाधू असल्याचा आरोप केला. हे दोघेही हातमिळवणी करून निवडणुका लढवतात. अयोध्येत बाबरी मशीद ही अडवाणी - मुलायम यांच्या षड्यंत्रामुळे पडली. त्याचा लाभ दोन्ही पक्षांनी उचलला, असे बेनी म्हणाले.