आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान मुरुगनला दाखवतात चॉकलेटचा नैैवेद्य!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाप्पुझा- नवससायास फेडण्यासाठी किंवा मनोकामनापूर्तीसाठी देवाला नैवेद्य दाखवण्याची भारतीय परंपरा प्राचीन आहे; परंतु एखाद्या देवाला तोंडाला पाणी आणणार्‍या चॉकलेटचा नैवेद्य दाखवला जातो असे तुम्ही कधी ऐकले आहे काय?

ईश्वराची कृपादृष्टी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक फुले, श्रीफळ, चंदन अर्पण करतात, परंतु केरळमधील ‘थेक्कन पलानी’ बालसुब्रमण्यम मंदिर मात्र इतर मंदिरांपासून थोडे वेगळे आहे. या मंदिराच्या गर्भगृहात चक्क तोंडाला पाणी आणणार्‍या चॉकलेट बारचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. भाविक एका आघाडीच्या कंपनीच्या चॉकलेट बारचा नैवेद्य दाखवतात आणि तेच चॉकलेट बार त्यांना पूजेनंतर प्रसाद म्हणून परत दिल्या जातात. सुब्रमण्यपुरम भागात असलेले हे मंदिर ‘मंच मुरुगन’ म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व जातिधर्मांचे आणि पंथांचे लोक भगवान मुरुगनचा आशीर्वाद घेण्यासाठी चॉकलेट्सचे बॉक्स घेऊन मंदिरात येतात. नैवेद्य म्हणून चॉकलेट आणि प्रसाद म्हणूनही चॉकलेटच मिळत असल्यामुळे या मंदिरात मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, असे मंदिराच्या पुजार्‍याने सांगितले.

आधी मुले, आता सर्वच भाविक
प्रारंभी या मंदिरात मुले चॉकलेटचा नैवेद्य दाखवत होती; परंतु आता सर्व वयोगटांतील देश-विदेशातील भाविकही भगवान मुरुगनला चॉकलेटचाच नैवेद्य दाखवतात.

मुरुगन हा भगवान शंकराचा मुलगा
भगवान मुरुगन किंवा कार्तिकेय हा भगवान शंकराचा मुलगा असल्याची पौराणिक कथा आहे. सुब्रमण्य नावानेही तो ओळखला जातो.

प्रथेबाबत सगळेच अनभिज्ञ
चॉकलेटचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा कधी आणि कशी सुरू झाली, याबाबत कोणालाच काहीही माहीत नाही. या मंदिरातील भगवान मुरुगनची मुख्य मूर्ती बालमुरुगनची म्हणजेच मुलाच्या रूपातील मुरुगाची आहे. बाल मुरुगाला चॉकलेट आवडत असावे असे कोणाला तरी वाटले असावे आणि म्हणून त्याने चॉकलेटचा नैवेद्य दाखवला असावा आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असावी, असे मंदिराचे व्यवस्थापक डी. राधाकृष्णन यांनी सांगितले.