बंगळूरू - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायनशास्रज्ञ आणि भारतात सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना जपानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तशी घोषणा जपान सरकारच्या वतीने करण्यात आली. विज्ञानातील भरीव योगदान आणि भारत-जपानमधील माहिती क्षेत्रातील योगदानाबद्दल
राव यांची जपान सरकारने दखल घेतली आहे.
जपानचा ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार’ हा पुरस्कार जपान सरकारतर्फे दिला जातो. यंदा तो मूळ भारतीय असलेले डॉ. राव यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक संशोधन केंद्राने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जपानने या पुरस्कारासाठी निवड केलेले डॉ. राव हे एकमेव भारतीय शास्त्रज्ञ आहेत.
डॉ. राव हे सध्या राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेत प्राध्यापक आणि बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू विज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत. राव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक असून त्यांनी आतापर्यंत १६०० हून अधिक संशोधन प्रबंध सादर केले आहेत. राव यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. ५० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांना ७० संस्थांनी डॉक्टरेट बहाल केली आहे. याशिवाय अनेक देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.