आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ground Report: 10-10 वर्षांची मुले देतात हिजबुल-पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्‍मीर- काश्मीरमध्ये दहशतवादी पोलिसांप्रमाणेच झडती घेत आहेत. जवान दहशतवाद्यांना घेरत असताना दगडफेक करणारे त्यांना पळून जाण्यास मदत करत आहेत. द. काश्मीरमधील स्थिती सर्वात खराब आहे. तेथे १०-१० वर्षांची मुले ‘हिजबुल मुजाहिदीन’च्या घोषणा देत आहेत. सर्वात जास्त प्रभावित भागाचा हा वृत्तांत...  

दहशतवादी करतात चौकशी, ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण  
अनंतनाग (उपमिता वाजपेयी) -
दक्षिण काश्मीरच्या अनंतनागचे बिजबेहडा गाव. अगदी महामार्गावर. शकीलच्या घरी तिसऱ्यांदा लग्नाची तयारी सुरू आहे. पहिल्यांदा पुरामुळे आशेवर पाणी फिरले. गेल्या वर्षी पुन्हा तयारी झाली, पण बुरहान वानी या दहशतवाद्याच्या चकमकीनंतर सहा महिने संचारबंदी होती. या वर्षी पुन्हा तारीख ठरली; पण लग्न होणार की नाही याची भीती आहे. झाले तरी आनंदोत्सव होऊ शकत नाही. सध्या कुठलेही काम धामधुमीने करू नका, असे दहशतवाद्यांचे कडक फर्मान आहे.

किमान दक्षिण काश्मीरमध्ये तरी नाही.  कारण दर दुसऱ्या गल्लीत कोणाचा तरी मृत्यू  झाला आहे. कोणाचा दगडफेकीत, तर कोणाचा चकमकीत! दहशतवाद्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. आनंदोत्सव झालाच तर त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. असे म्हटले जाते की, काश्मिरी नागरिक आयुष्यभर फक्त घर बांधण्यासाठी आणि लग्नांचा खर्च करण्यासाठीच कमावतात. तेथे लग्नात ३ क्विंटल मांस एका मेजवानीत लागते. शामियाने आणि रोषणाई तर पाहण्यासारखी असते; पण आता दहशतीच्या सावलीत त्याला मनाई आहे. बिजबेहडापासून काही अंतरावरच त्राल आहे. शनिवारची सकाळचीच घटना. तेथे राहणाऱ्या ताहिर वानींची मुले शाळेसाठी तयार होत होती. अचानक बातमी आली की, शेजारच्याच गावात चकमक सुरू आहे. लोक घरांतून बाहेर पडून चकमक रोखण्यासाठी दगडफेकही करत आहेत.

शाळा, दुकाने सर्व बंद करण्यात आली आहेेत. मुलांनी चिडून दप्तर फेकले आणि आईला म्हणाले, ‘दर एका दिवसाआड शाळा बंद होते, आता आम्ही कधीच शाळेत जाणार नाही.’ गेल्या वर्षीही शाळा सहा महिने बंद होती. या वेळी तुकड्या-तुकड्यांत निदर्शने होत आहेत. आबिद म्हणाले की, काश्मिरींना संचारबंदी आणि बंदच्या काळातही व्यवसाय करण्याची कला अवगत झाली आहे. आम्ही तोट्यात आहोत. आठवड्यात भलेही दोन दिवसच व्यवसाय होतो, पण दररोजचे भागते. काही काळासाठी स्थिती सामान्य झाली की लोक भराभर गरजेचे साहित्य खरेदी करतात. महिन्याचे रेशन जमा करणे ही तशीही काश्मिरींची परंपराच आहे. सर्वात जास्त भीती राजकीय कार्यकर्ते आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वाटते. दक्षिण काश्मीरमधील गेल्या आठवड्याची घटना. अर्ध्या रात्री पुलवामात दहशतवादी आले आणि एका गावाला घेरले.

सुरक्षा दले ज्याप्रमाणे क्रॅकडाऊनसाठी किंवा झडतीसाठी करतात तशी. दहशतवादी ज्यांना पोलिस-सरकारचे खबरे मानतात असे राजकीय कार्यकर्ते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. दहशतवाद्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. अचानक सुरक्षा दले पोहोचली तेव्हा दहशतवादी पळून देले. दुर्दैव म्हणजे स्थानिक लोकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक करून दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत केली. लोक म्हणतात की, पोलिस कर्मचारी किंवा लष्कर त्यांना अकारण मारणार नाही, पण दहशतवाद्यांना कोणतेही नियम-कायद्यांची पर्वा नाही. त्यामुळे जास्त भीती दहशतवाद्यांची आहे. आता दक्षिण काश्मीरमध्ये राजकीय काम ठप्प आहे. एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला किंवा मंत्र्याला भेटायचे असेल तर तो लपून भेटतो. कोणीही खुलेआम आपण अमुक पक्षाचे आहोत, असे म्हणत नाही. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री आणि मंत्रीही दक्षिण काश्मीरमधील गावांत आता जाऊ शकत नाहीत.  अधिकारी-मंत्र्यांचे दौरे, पाहणी सर्व बंद आहे. दहशतवाद्यांच्या ‘टार्गेट’वर असल्याने एक स्थानिक नेते तर जवळपास पळून जात, संपूर्ण रात्र चालून अनंतनागहून श्रीनगरला पोहोचले. दक्षिण काश्मीरमध्ये खोऱ्यातील १० पैकी कुलगाम, शोपियां, अनंतनाग आणि पुलवामा हे चार जिल्हे येतात. म्हणजे जवळपास ४५ टक्के भाग.  
 
काश्मीरमधील पोलिसांचे कुटुंबीय तर तेथे राहू शकत नाहीत आणि सोडूनही जाऊ शकत नाहीत. दहशत एवढी की, मुलांना जम्मूच्या शाळा-वसतिगृहांच्या आश्रयाने शिकवत आहेत. जे येथे काश्मीरमध्ये राहत आहेत त्यांना दररोज दहशतवाद्यांची भीती. ते आता फक्त गप्प राहतात. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करणे सुरू केले होते. परिस्थिती एवढी बिघडलेली होती की घरी जाऊ नका, पोलिस कॅम्पसमध्येच राहा, असे निर्देश जम्मू-काश्मीर पोलिस विभागाला आपल्या जवानांना द्यावे लागले होते. स्थिती आणखी बिघडली तेव्हा, ‘तुुम्ही आम्हाला लक्ष्य केले तर आम्ही तुम्हाला लक्ष्य करू,’ असा इशारा पोलिसांनी दहशतवाद्यांना दिला. तेव्हापासून दहशतवादी काहीसे भयभीत आहेत. जफर म्हणाले की, काश्मीर ट्रेंडनुसार चालतो. दरवेळी नवा ट्रेंड. एकाने एसटीडी दुकान उघडले की सर्व जण तेच करतील. एक जण दहशतवादी झाला तर सर्व जण होतील. एका मुलीने दगडफेक केली तर सर्व महाविद्यालय तसे करेल. या वेळी बँक लुटणे आणि शस्त्रास्त्रे हिसकावण्याचा ट्रेंड आहे.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, 10-10 वर्षांची मुलेही देत आहेत हिजबुल-पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा...
बातम्या आणखी आहेत...