भोपाळ- दैनिक भास्कर समूह डिजिटल क्षेत्रात मोठी भरारी घेत आहे. ‘डीबी डिजिटल’ नावाने नव्या ब्रँडच्या स्थापनेसोबतच कंपनी या क्षेत्रात अनेक नव्या योजना सुरू करणार आहे. कंपनीच्या या डिजिटल कुटुंबात आता हिंदी, गुजराती व इंग्रजी वेबसाइट्ससोबतच मोबाइल अॅप्सही समाविष्ट होत आहेत. ‘दिव्य मराठी’च्या वेबसाइटचाही यात समावेश असेल.
या माध्यमातून भास्कर समूहाच्या देश-विदेशातील वाचकांना देश-विदेशातील बातम्यांबरोबरच विविध राज्ये व शहरांतील ताज्या घडामोडी वाचावयास मिळतील. एवढेच नव्हे तर भास्कर समूह आता आपल्या ‘बॉलीवूड भास्कर डॉट कॉम’च्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठीतून बॉलीवूडमधील ताज्या घडामोडी व छायाचित्रे वाचकांपर्यंत पोहोचवणार आहे.
सध्या समूहाच्या या वेबसाइट्सना महिन्याकाठी 1 कोटी 25 लाख वाचक भेट देतात. या अनुषंगाने भास्कर समूह आता व्यापार-उद्योगांत रस असलेल्या वाचकांसाठी ‘मनी भास्कर’ ही वेबसाइट तर रिअल इस्टेट क्षेत्रातील सविस्तर माहितीसाठी वेगळी वेबसाइट लाँच करणार आहे.
सध्या डिजिटल क्षेत्रात समूहाच्या वतीने मोफत मोबाइल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा पुरवली जात असून विविध क्षेत्रातील वाचक यामुळे चोवीस तास अपडेट राहतील.