आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाट आंदोलन : हुडा यांच्या सहकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - जाट आरक्षण आंदोलनाच्या वेळी हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांचे जवळचे सहकारी वीरेंद्र यांच्यावर बुधवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक यशपाल सिंघल यांनी सांगितले की, वीरेंद्र हे हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचे संभाषण असणारी ऑडिओ क्लिप मिळाली आहे. या संभाषणात मान सिंह दलाल हेही सहभागी असून या दोघांवर रोहतकमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर इतरही आरोप ठेवण्यात आले आहेत. भिवानी येथील नागरिक पंकजकुमार यांनी या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. क्लीपमधील आवाज आपलाच आहे, असे वीरेंद्र यांनी आधी कबूल केले होते, पण नंतर त्यांनी त्यात बदल केल्याचा आरोप केला होता. हे संभाषण आंदोलनापूर्वीचे आहे.

संचारबंदी हटवली : आंदोलनातील हिंसाचारानंतर राज्यातील स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. हिसार जिल्ह्यातील संचारबंदी हटवण्यात आली आहे, तर रोहतक आणि भिवानी या जिल्ह्यांतील संचारबंदी काही तास थिथिल करण्यात आली आहे. तेथील रस्ते आणि रेल्वे वाहतूक आता हळूहळू सुरळीत होत आहे. ३५ महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बुधवारी सुरू झाल्या, पण अजूनही ६० रेल्वे गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत.
बातम्या आणखी आहेत...