पाटणा - इंग्रजांनी महात्मा गांधींसोबत जसे वर्तन केले नाही, त्यापेक्षा जास्त त्रास इंदिरा गांधी यांच्या शासनकाळात लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांना सोसावा लागला. इंग्रजांपेक्षा इंदिरा गांधींचा शासन काळ वाईट म्हणणाऱ्या या ओळी बिहार सरकारच्या वेबसाइटवर होत्या.
रविवारी त्याबाबतचा अहवाल पुढे आल्यानंतर सत्तारूढ आघाडीत सहभागी काँग्रेसने इंदिरा गांधींबाबतच्या ओळींना तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसचे प्रदेश माध्यम प्रभारी चंदन यादव यांनी यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, इंदिरा गांधींची बदनामी करणारा हा मजकूर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही. त्यानंतर सरकारने तातडीने कारवाई करत हा मजकूर वेबसाइटवरून हटवला. बिहार सरकारच्या वेबसाइटवरील परिचयामध्ये बिहारच्या इतिहासाचा उल्लेख आहे.
त्यात आणिबाणीसह पुढील मजकुराचा उल्लेख आहे. २६ जून १९७५ रोजी आणिबाणी लागू करण्यात आली. १९७४ पासून जेपींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन दाबण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणिबाणीची घोषणा केली. जेपींनी मोठ्या निग्रहाने इंदिराजींचे अर्निबंध शासन पाडले व त्यांचा मुलगा संजय गांधींना विरोध केला होता.